मुदतपूर्व ठेवी काढण्याला पायबंद घालणारा अभूतपूर्व निर्णय

मुंबई : रोखीच्या चणचणीचा सामना करावा लागत असलेल्या दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात डीएचएफएल या गैरबँकिंग वित्तीय कंपनीने नव्याने कोणत्याही ठेवींची स्वीकृती तात्पुरती थांबविण्याबरोबरच, विद्यमान ठेवीदारांना त्यांची ठेव मुदतपूर्व काढून घेण्याला पायबंद घालत असल्याचे जाहीर केले आहे. ठेवीदारांसाठी धक्कादायक असा म्हणजे ठेवी वठवण्यावर निर्बंध आणणारा प्रसंग देशाच्या वित्तक्षेत्रासाठी अभूतपूर्व स्वरूपाचाच आहे.

डीएचएफएलने मंगळवारी रात्री ई-मेल संदेशाद्वारे या निर्णयाची माहिती आपल्या ठेवीदार ग्राहकांना दिली. या ई-मेल संदेशानुसार, ‘‘पतमानांकन दर्जात केल्या गेलेल्या ताज्या बदलानुसार, कंपनीने आपल्या मुदत ठेव कार्यक्रमात फेरबदल केले आहेत. नव्याने ठेवींची स्वीकृती तसेच ठेवींचे नूतनीकरण हे ताबडतोब रोखण्यात येत आहे. तर दायित्व व्यवस्थापनाचा भाग म्हणून मुदतपूर्व ठेवी काढून घेणे रोखण्यात येत आहे,’’ असे कंपनीने नमूद केले आहे. हे सर्व राष्ट्रीय गृहनिर्माण बँक (एनएचबी) या नियामक संस्थेच्या नियमांनुरूपच असल्याची तिने पुस्ती जोडली आहे.

एनएचबीच्या नियमानुसार, गुंतवणूक श्रेणीचा पतदर्जा नसलेल्या कोणत्याही कंपनीला ठेवी स्वीकारून निधी उभारता येत नाही. आयएलएफएस संकटाच्या पाश्र्वभूमीवर डीएचएफएल रोकडसुलभतेचा अभावाचा सामना करीत असून, या कंपनीलाही तिच्या कर्जाची परतफेड करणे अवघड बनले आहे, अशा गेल्या काही महिन्यांत वदंता आहेत. सोमवारी १३ मे रोजी ‘क्रिसिल’सह अन्य तीन पतमानांकन संस्थांनी डीएचएफएलच्या पतदर्जात बदल करून तो खालावत असल्याचे जाहीर केले.

समभागाला ९ टक्के मूल्यऱ्हासाचा दणका

ठेवीदारांसाठी जाचक निर्णयाचे बुधवारी भांडवली बाजारात डीएचएफएलच्या समभागावर विपरीत पडसाद दिसून आले. मुंबई शेअर बाजारात डीएचएफएलचा समभाग ९.४३ टक्के घसरणीसह ११७.६५ रुपयांवर गडगडला. दिवसाच्या व्यवहारात त्याने १७.५१ टक्के गडगडून १०७.१५ चा नीचांकही गाठला होता.