करोनावर विजय मिळवल्याची मेखी भोवली : रघुराम राजन

नवी दिल्ली : गेल्या वर्षीच्या करोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्यानंतर आपण मेखी मिरवली.  करोनावर आपण विजय मिळवला, असे म्हणून आपणच आत्मसंतुष्टता दाखवली. आणि नेमके हेच आपल्याला नडले, अशा शब्दात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. रघुराम राजन यांनी भारतातील आरोग्यस्थिती व्यवस्थापनावर टीका केली आहे. देशातील सध्याच्या वाढत्या करोना संकटामागे दृरदृष्टी तसेच नेतृत्वाचा अभाव असल्याचे थेट भाष्यही भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर राहिलेल्या राजन यांनी केले.

‘ब्लूमबर्ग’ या इंग्रजी वित्त वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजन यांनी म्हटले की, गेल्या वर्षीच्या करोना साथ प्रसारानंतर भारताने त्यावर चालू वर्षांच्या सुरुवातीला बऱ्यापैकी वैश्विक महासाथीवर नियंत्रण मिळवले होते. मात्र त्याबाबत यश आल्याचे आपण जगजाहीर करून स्वत:चेच कौतुक करून घेतले. ब्राझिलसारख्या देशात विषाणू पुन्हा उग्र रूप धारण करू शकतो, हे जरी लक्षात घेतले असते तरी सावधगिरी जोपासता आली असती.

जागतिक स्तरावर करोना रुग्णांची तसेच मृत्यूमुखींची संख्या दिवसागणिक वाढत असून प्रसंगी पुन्हा एकदा देशव्यापी टाळेबंदी लागू करण्याची आवश्यकता विविध स्तरावरून मांडली जात आहे. याबाबत राजन यांनी म्हटले आहे की, देशात लसीकरणाची प्रक्रिया गतीने व्हायला हवी होती. सर्वानी मिळून वेगाने कार्य करण्यासारखी सद्यस्थिती असून करोना, टाळेबंदीसारख्या संकटावर आपत्कालिन म्हणून काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. राजन यांच्या मुलाखतीतील टीकेचा रोष हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच असल्याचे मानले जाते. रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदी असताना राजन यांचे पंतप्रधानांबरोबर नोटाबंदी लागू करण्यावरून मतभेद झाल्याचे सांगितले जाते. राजन यांनी मुदतपूर्व राजीनामा देताच देशात निश्चलनीकरण लागू झाले.

आघाडीचे बँकर उदय कोटक यांनीही करोना साथीवर नियंत्रण मिळवण्याच्या जाहीर वक्तव्याबद्दल पंतप्रधानांचे नाव टाळून नाराजी व्यक्त केली होती.

उन्मादाने करोनावर विजय मिळवल्याचे जाहीर करून घाईच झाली, अशी टीका कोटक यांनी केली होती. सध्याच्या वाढत्या करोना संकटावर टाळेबंदीसारख्या उपाययोजनांचे सूचनाही त्यांनी केली होती. तर उद्योगांना कमी मनुष्यबळात काम करण्याचे सांगितले होते.