वस्तू आणि सेवा कर संकलन, रेल्वेद्वारे मालवाहतुकीतील वाढ, पेट्रोलची वाढलेली मागणी, विजेचा पूर्वीच्या पातळीवर आलेला अत्युच्च वापर, इलेक्ट्रॉनिक पथकर संग्रहण वगैरे अर्थचक्र पूूर्वपदावर येत असल्याचे ठोस संकेत आहेत, असे प्रतिपादन भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआयने मंगळवारी केले. हे पाहता करोनाबाधा आणि टाळेबंदीने ग्रासलेल्या अर्थव्यवस्थेत तीव्र स्वरूपाची उभारी दिसून येईल, असा विश्वासही या संघटनेने व्यक्त केला आहे.

ही खरोखरच आश्वासक चिन्हे असून, टाळेबंदी उठल्यानंतर अर्थव्यवस्थेत इंग्रजी आद्याक्षर ‘व्ही’ आकाराप्रमाणे तीव्र स्वरूपाची उभारी शक्य असल्याचे दिसून येते, असे सीआयआयचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. तथापि फेरउभारीची ही प्रारंभिक लक्षणे असून, त्यांना ठोस स्वरूप यावयाचे तर, टाळेबंदी आणि निर्बंधांसंबंधी देशाच्या कैक भागात असलेली अनिश्चितता लवकरात लवकर दूर केली जायला हवी.

आजही अनेक प्रकारच्या गोष्टींवर निर्बंध कायम, तर टाळेबंदीचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडून केव्हाही फिरविला जातो. या अनिश्चिततेची दखल घेत, केवळ काही आठवडय़ांचा दृष्टिकोन ठेवून उद्योग क्षेत्राला कोणतेही नियोजन आखणे अशक्य असल्याने, त्याचा सर्व प्रकारच्या कार्यान्वयनावर विपरीत परिणाम होत असल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले.

साथीच्या संक्रमणाच्या प्रगतीसंबंधी काही ठोस अनुमानांसह अनिश्चितता कमी केली गेली तर उद्योगधंदे आणि ग्राहकांचा आत्मविश्वास वाढविणारी ती बाब ठरेल, असे बॅनर्जी यांनी मत व्यक्त केले. पुरवठा शृंखला ही सर्व राज्य आणि जिल्ह्य़ांच्या सीमांवरून, अगदी प्रतिबंधित क्षेत्रातही अव्याहत सुरू राहणेही अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

महत्त्वाची सुचिन्हे..

चालू वर्षांत कृषी क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठा आशेचा किरण असल्याचे ‘सीआयआय’ने नमूद केले आहे. ग्राहकोपयोगी उत्पादने आणि आरोग्यनिगा-औषधी निर्माण क्षेत्रात १५ ते २० टक्के वाढ आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये दिसून येईल. आयटी उद्योग पाच टक्क्यांपर्यंत वाढ संभवते. शेतीपाठोपाठ सर्वाधिक रोजगारक्षम बांधकाम उद्योगातही बहुतांश ठिकाणी कामकाज सुरू झाले आहे. त्या उलट हवाई उड्डाण, हॉटेल्स व आतिथ्य उद्योग तसेच व्यापारी वाहने हे सर्वात वाईट प्रभाव पडलेली उद्योग क्षेत्रे असतील.