रिझव्‍‌र्ह बँकेकडून नियुक्त प्रशासकांचे प्रतिपादन

मुंबई : ठेवीदारांची पैसे देण्यासाठी बँकेकडे पुरेशी रोकड असून ठेवीदारांनी न गोंधळता संयम राखावा, असे आवाहन पंजाब अँड महाराष्ट्र (पीएमसी) सहकारी बँकेवर नियुक्त प्रशासकांनी गुरुवारी केले.

आर्थिक अनियमिततेनंतर निर्बंध आलेल्या पीएमसी बँकेच्या विविध शाखांमध्ये संतप्त ग्राहक, खातेदारांची गर्दी गेल्या दोन दिवसांपासून वाढली आहे. बँकेवर बुधवारी प्रशासक नेमण्यात आला. तर गुरुवारी रक्कम काढण्याची मुदत १०,००० रुपयांपर्यंत विस्तारण्यात आली.

सहकारी बँकेवरील रिझव्‍‌र्ह बँक नियुक्त प्रशासक जे. बी. भोरिया यांनी बँकेकडे ११,६१७ कोटी रुपयांच्या ठेवी असून तातडीने रक्कम द्यावयाची झाल्यास २,५५५ कोटी रुपये तरल स्वरूपात उपलब्ध आहेत, असे स्पष्ट केले. बँकेच्या ताळेबंद, आर्थिक स्थितीबाबतची पडताळणी सुरू असून त्याबाबतच्या चुका दुरूस्त करण्याची प्रक्रिया रिझव्‍‌र्ह बँकेने आखून दिलेल्या विहित कालावधीत किंवा त्या आधीही पूर्ण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बँकेचे वैधानिक तरलता प्रमाण १९ टक्के असून रोख राखीवता प्रमाण ३ ते ४ टक्के असल्याचेही भोरिया म्हणाले. बँकेतील एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण असल्याचे त्यांनी सांगितले.

निर्बंध लागू झालेल्या कालावधीत व्यवस्थापकीय संचालक असलेल्या जॉय थॉमस यांनीही ठेवीदारांची सर्व रक्कम चुकवण्याकरिता बँकेकडे पुरेशी रोकड असल्याचे नमूद केले आहे. बँकेकडे ४,००० कोटींची रोकड तरलता असल्याचेही ते म्हणाले.

‘कारवाईसाठी एचडीआयएलच निमित्त’

पीएमसी बँकेवरील कारवाईसाठी बँकेचा सर्वात मोठा आणि जुना ग्राहक एचडीआयएल समूह हेच निमित्त ठरल्याची प्रतिक्रिया माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी दिली. हे एक खाते वगळता अन्य सर्व खाती सुरक्षित असून त्याबाबत ठेवीदारांनी चिंता करण्याची गरज नाही, असे थॉमस यांनी सांगितले. एचडीआयएलचा मुंबई विमानतळानजीकचा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प अडचणीत आल्याने बँकेतील कर्जखाते अनुत्पादित श्रेणीत गेल्याचे ते म्हणाले. समूहाला किती कोटी रुपयांचे कर्ज दिले व किती रक्कम थकीत आहे, हे मात्र त्यांनी सांगितले नाही.