संपूर्ण देशात खळबळ उडविणाऱ्या नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड कंपनीतील साडेपाच हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी बुधवारी कंपनीचा उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख अमित मुखर्जी याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील ही पहिलीच अटक आहे.
  मुंबई गुन्हे शाखेचा आर्थिक गुन्हे विभाग या प्रकरणाची चौकशी करत आहे. बुधवारी मुखर्जी यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अटक केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांनी सांगितले. मंगळवारी याप्रकरणी कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (आर्थिक तंत्रज्ञान) जिग्नेश शहा यांच्यासह कंपनीचे संचालक जोसेफ मेसी, श्रीकांत जवळगेकर आणि देवांग नेराला यांचे जबाब नोंदविण्यात आले होते. आपल्या जबानीत मुखर्जी यांच्याबरोबरच माजी कार्याधिकारी अंजनी सिन्हा यांच्यावर आरोप करत त्यांच्या संशयास्पद कार्यपध्दतीची माहिती त्यांनी दिली होती.  कंपनीचा बिझनेस विभागाचा प्रमुख असलेल्या मुखर्जी याच्यावर आर्थिक धोरणे ठरविणे, नवीन सभासद, गुंतवणूकदार आणणे आदी जबाबदाऱ्या होत्या. याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासूनच त्याच्या अटकेची शक्यता होती. मीरा रोड येथील त्याच्या राहत्या घरीही पोलिसांनी छापा घातला होता. मुखर्जी याने डिफॉल्टर गुंतवणूकदारांना कंपनीत आणले होते तसेच त्याची कार्यपद्धतीही संशयास्पद होती.
 केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेनेही याप्रकरणाची चौकशी सुरू केली असून अंमलबजावणी संचलनालयानेही याबाबतचा तपशिल मागविला आहे. कंपनीने देशभरातील १३ हजार गुंतवणूकदारांना ५ हजार ६०० कोटी रुपयांना गंडा घातला आहे. यापूर्वीच आर्थिक गुन्हे शाखेने कंपनीची खाती गोठवली असून कंपनीच्या देशभरातील गोडाऊन आणि कार्यालयावर छापे घालण्यास सुरवात केली आहे.