करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांना आपल्या भविष्य निर्वाह निधीतून ७५ टक्क्यांपर्यंतची रक्कम काढण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर तब्बल १ लाख ३७ हजार कर्मचाऱ्यांनी यासाठी अर्ज केले होते. त्यानुसार सरकारनं आतापर्यंत तब्बल २७९.६५ कोटी रूपयांची रक्कम वर्ग केल्याची माहिती समोर आली आहे. ईपीएफओनं गुरूवारी याबाबत माहिती दिली.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत सरकारनं १.७ लाख कोटी रूपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. त्यादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटकाळात कर्मचाऱ्यांना आपल्या भविष्य निर्वाह निधी खात्यातून ७५ टक्के रक्कम काढणं किंवा तीन महिन्यांच्या वेतनाएवढी रक्कम काढण्याची परवानगी दिल्याचं सांगितलं होतं. तसंच ही रक्कम तात्काळ वर्ग करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. सरकारच्या घोषणेनंतर ईपीएफओनं कोविड-१९ साठी निधी काढण्यास मंजुरी दिल्याचं नोटीफिकेशन जारी केलं होतं. तसंच ऑनलाइन पोर्टलवरदेखील याबाबत ऑप्शन देण्यात आला होता. सध्या अशाप्रकारे अर्ज करणाऱ्यांना प्राधान्य दिलं जात आहे.

ही योजना सुरू करण्यात आल्यानंतर आतापर्यंत १.३७ लाख क्लेम प्रोसेस करण्यात आलेले आहेत. यानुसार आतापर्यंत २७९.६५ कोटी रूपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. भविष्य निर्वाह निधी धारकांच्या संबंधित खात्यात ७२ तासांमध्ये ही रक्कम जमा होते. यासाठी केव्हायसी पूर्ण असणं आवश्यक आहे, असं ईपीएफओकडून सांगण्यात आलं.