चालू आर्थिक वर्षांत एप्रिल ते जुलै या पहिल्या चार महिन्यांत म्युच्युअल फंडांच्या समभाग (इक्विटी) योजनांमध्ये नवीन ११.६७ लाख गुंतवणूकदार खात्यांची भर पडली आहे. त्या आधी सरलेल्या २०१४-१५ या संपूर्ण आर्थिक वर्षांत विक्रमी २५ लाख नवीन गुंतवणूक खाती सुरू झाली होती. यंदा नव्या गुंतवणूकदारांच्या वाढीचा दर त्याहून मोठा असल्याचे दिसते.
एकाच गुंतवणूकदाराची वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक एकापेक्षा अधिक असण्याची शक्यता असली, तर खात्यांच्या संख्येतील वाढ ही एकूण सामान्य गुंतवणूकदारांच्या शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत वाढलेला कल निश्चितच दर्शविते. जुलै २०१५ अखेर देशात कार्यरत ४४ म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांमधील गुंतवणूक खात्यांची संख्या ३ कोटी २८ लाख ५८ हजार ८३० अशी झाली आहे, जी मार्च २०१५ अखेर ३ कोटी १६ लाख ९१ हजार ६१९ अशी होती. म्हणजे चार महिन्यांत ११.६७ लाखांची भर पडली आहे.
त्या पूर्वीच्या चार वर्षांत मात्र, म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांतून तब्बल दीड कोटी गुंतवणूकदार खात्यांना गळती लागल्याचे आढळून आले. मार्च २००९ मध्ये इक्विटी फंडांतील गुंतवणूकदार खात्यांनी सार्वकालिक ४.११ कोटींचा कळस गाठला होता. त्यानंतर जागतिक वित्तीय अरिष्टापायी मंदावलेल्या भांडवली बाजारात इक्विटी फंडांच्या गुंतवणुकीलाही घरघर लागली.
सरलेल्या चार महिन्यांत केवळ गुंतवणूकदारांची संख्याच नव्हे तर एकूण गुंतवणूकही वाढली आहे. एप्रिल ते जुलै २०१५ या चार महिन्यांत ३९,००० कोटींच्या गुंतवणुकीचा इक्विटी फंडांमध्ये नव्याने ओघ आला. इक्विटी योजनांकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढल्याचा परिणाम म्हणून म्युच्युअल फंडांच्या अन्य सर्व प्रकारच्या योजनांतील गुंतवणूकदार खात्यांची संख्या ४.३२ कोटींवर गेली आहे, जी मार्च २०१५ अखेर ४.१७ कोटी अशी होती.