सरकारी कंपन्यांमार्फत ८,००० कोटींची उभारणी

केंद्र सरकारच्या मालकी असलेल्या ११ कंपन्यांचे समभाग असलेला इटीएफ फंड २७ नोव्हेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला होत असून या फंडाचे व्यवस्थापन रिलायन्स निप्पोन लाईफ असेट मॅनेजमेंट कंपनीकडून केले जाणार आहे.

केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपन्यांचे निर्गुंतवणूक इटीएफमार्फत करण्याचा हा रिलायन्स निप्पोन लाईफ असेट मॅनेजमेंट कंपनीकडून यंदाचा तिसरा प्रयत्न आहे. केंद्र सरकारच्या मालकीच्या ११ कंपन्यांच्या समभागांची विक्री करून ८,००० कोटींची रक्कम उभारण्यात येणार असून मागणीनुसार निर्गुंतवणूक करून ही रक्कम १२ ते १४ हजार कोटींपर्यंत वाढविण्याची मुभा असल्याचे रिलायन्स म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप सिक्का यांनी सांगितले.

मागील आर्थिक वर्षांत केंद्र सरकारने इटीएफमार्फत केलेली निर्गुंतवणूक १० कंपन्यांची होती. नव्याने होणाऱ्या निर्गुंतवणूकीत ११ कंपन्याचा समावेश आहे. प्रास्तावित विक्रीत तेल शुद्धीकरण क्षेत्राचा समावेश करण्यात आलेला असून एनटीपीसी,  एनएलसी, एनएचपीसी आणि एनबीसीसी चार कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रास्तावित सीपीएसई-३ या प्राथमिक विक्रीची २७ नोव्हेंबर पासून सुरवात होणार आहे.

केंद्रीय अर्थ खात्याच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागातर्फे याबाबतची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. सरकारच्या निगरुतवणूक धोरणाचाच हा एक भाग आहे.सर्वच श्रेणींतील गुंतवणूकदारांना याकरिता ४.५ टक्के सवलत मिळणार आहे. या प्रकियेकरिता सल्लागार म्हणून आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेडची नेमणूक करण्यात आली आहे.

महारत्न, नवरत्न, मिनीरत्न, सेक्टर लीडर्स आणि मोनोपोलिस या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या समावेशासह ११ महत्वाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.

महत्वाच्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड खुला व बंद होण्याची तारीख २७ नोव्हेंबर असून किमान महत्वाच्या गुंतवणूकदारांसाठी फंड खुला होण्याची तारिख २८ नोव्हेंबर व बंद होण्याची तारिख ३० नोव्हेंबर आहे.