व्यवसाय विस्तार आराखडय़ाचा पीएनबी मुख्याधिकाऱ्यांचा दावा

मुंबई  : हिरे व्यापारी नीरव मोदी घोटाळ्याच्या रकमेपेक्षा अधिक आणि इतिहासातील सर्वाधिक तोटा सोसाव्या लागलेल्या पंजाब नॅशनल बँकेतील स्वच्छतेसंबंधाने कार्यवाही पूर्ण झाली असून, वेगाने व्यवसाय वाढीचा आराखडा तयार असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी सांगितले.

नीरव मोदी घोटाळ्याचा उल्लेख करताना, ‘चुकीतून धडा मिळाल्यानंतर सुधारण्याची संधी प्रत्येकालाच मिळते; या रूपाने कंपनी, उद्योग-व्यवसायातील प्रतिकूलतेपेक्षा माणसांविषयीची जोखीम अधिक वाटते’ असे उद्गार सुनील मेहता यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत काढले.

जानेवारी २०१८ मध्ये मोदी प्रकरण उघडकीस आल्यानंतर बँकेकरिता तीन महिने खूपच आव्हानात्मक असल्याचे मेहता यांनी सांगितले. आर्थिकदृष्टय़ाही बँकेवर या बाबीचा ताण प्रचंड असल्याचे ते म्हणाले. मात्र गेल्या दोन महिन्यात बँकेची स्थिती सुधारत असून कर्ज वितरण वाढ १० टक्क्यांनी वाढल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर किरकोळ कर्ज वितरण वाढही १५ टक्क्यांपर्यंत गेल्याचे त्यांनी सांगितले.

संकटाच्या काळातही ग्राहक, खातेदारांनी बँकेवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत मेहता यांनी बँकेचा चालू वित्त वर्षांसाठीचा व्यवसाय विस्तार आराखडा तयार असल्याचे सांगितले.

बँक ग्रामीण, कृषी क्षेत्रावर अधिक भर देणार असून कर्मचारी भरती, शाखा विस्तारापेक्षा भक्कम व जलद माहिती तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन, सेवा सुविधा देण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे ते म्हणाले. वर्षभरात बँक १२ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय टप्पा गाठेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

घोटाळ्यात तपास यंत्रणेच्या माध्यमातून होणारी संबंधित दोषींवरील कारवाई पूर्ण झाली असून बँक लवकरच मालमत्ता विक्रीतून रक्कम वसूल करेल, असेही ते म्हणाले. बँकेंतर्गत कारवाई म्हणून कर्मचारी बदली, बढतीला स्थगिती ही प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. यातून व्यक्तीच्या निवडीविषयीची जोखीम अधिक आहे, हा धडा मिळाल्याचे सांगत त्यांनी प्रत्येक चुकीतून सुधाराची संधी असतेच, असे नमूद केले.

बँकांचे विलीनीकरणाचे प्रस्ताव तूर्त लांबणीवर

पंजाब नॅशनल बँकेत विलीन करून घेण्यासाठी दोन ते तीन राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रस्ताव असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी दिली. मात्र त्यांची नावे सांगण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली. बँक तूर्त पुन्हा आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्याच्या दिशेने वाटचाल करत असून कुणाही  बँकेला लगेचच विलीन करून घेण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सुस्थितीच्या प्रक्रियेला काही अवधी द्यावा लागेल, असे ते म्हणाले.

समभागाला घसरणीचा फटका

तिमाही वित्तीय निष्कर्ष जाहीर झाल्यानंतर भांडवली बाजारात सूचिबद्ध  पंजाब नॅशनल बँकेच्या समभागाचे मूल्य ६ टक्क्यांपर्यंत आपटले. मुंबईच्या शेअर बाजारात बँक समभागाचे मूल्य सोमवारच्या तुलनेत ६.२६ टक्क्यांनी खाली येत ८३.८० रुपयांवर स्थिरावले. त्याचा हा वार्षिक मूल्यतळ होता. राष्ट्रीय शेअर बाजारातही समभाग मूल्य ६.१० टक्क्यांनी घसरून ८३.८५ रुपयांवर आले. परिणामी बँकेचे बाजारमूल्य एकाच दिवसात ९३८.०७ कोटी रुपयांनी आपटून २३,७४०.९३ पर्यंत खाली आले.