अलीकडच्या काही वर्षांत म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीकडे सर्वसामान्यांची आस्था आणि विश्वास वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. मोठय़ा शहरांमध्ये म्युच्युअल फंड घराण्यांची व्याप्ती बऱ्यापैकी स्थापित असली तरी महानगरांपल्याडच्या गुंतवणूकदारांपर्यंत अनेक फंड घराणी अद्याप पुरती पोहोचलेली नाहीत. या पाश्र्वभूमीवर या उद्योगात नव्याने पाऊल टाकलेल्या महिंद्र म्युच्युअल फंडाने पहिल्या वर्षांत १५० शहर व निमशहरी क्षेत्रात विस्तार साधला असल्याचे स्पष्ट केले आहे.

महानगरांपलीकडच्या छोटय़ा व निमशहरी भागातून अनेक परंपरागत बचतकर्त्यांनी म्युच्युअल फंडांकडे वळण घ्यावे, या उद्देशाने प्रयत्नांचा भाग म्हणून १५० ठिकाणांहून परिचालन सुरू करण्यात आले, असे महिंद्र म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष बिश्नोई यांनी स्पष्ट केले. १५० शहरांतून अस्तित्व असलेला भारतातील हा पहिलाच म्युच्युअल फंड आहे. पहिल्या वर्षांत सुमारे ५५,००० गुंतवणूकदारांना आपल्या योजनांची विक्री करून, या फंड घराण्याने २,५०० कोटी रुपयांची गुंतवणूकयोग्य मालमत्ता (एयूएम) उभारली आहे.

महिंद्र म्युच्युअल फंडांच्या पाच योजना सध्या सुरू आहेत. ज्यामध्ये गुंतवणूकदारांच्या विविध गरजा जसे, धन संचय, भांडवल वृद्धी, कर बचत तसेच अल्पकालीन रोख तरलता यांची दखल घेतली गेली आहे. बिश्नोई यांच्या मते, वर्तमान बाजारातील उत्साही वातावरण पाहता, केवळ समभागसंलग्न योजना नव्हे तर ३० ते ४० वयोगटांतील गुंतवणूकदाराने महागाईला मात देईल अशा जोखीमसंतुलित परताव्याचा गुंतवणूक दृष्टिकोन अंगीकारणे आवश्यक बनले आहे. निश्चित केलेल्या आर्थिक उद्दिष्टांना सुरक्षितपणे गाठण्यासाठी हा संयमी व दीर्घकालीन मार्गच योग्य असल्याचे आपल्या शाखांमार्फत गुंतवणूकदाराना सांगितला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट  केले. चाळिशीतील गुंतवणूकदाराने खर्चवजा  वरकडीतील ५० टक्के समभागसंलग्न (लार्जकॅप) फंडात, २० टक्के रोखे फंड, सोने (गोल्ड ईटीएफ), २० टक्के करमुक्त रोख्यांमध्ये, तर १० टक्के  रोखसदृश तरल योजनांमध्ये गुंतवावा, असे त्यांनी सुचविले.