उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही

मुंबई : कॅप्टन अमोल यादव यांनी भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. त्यांच्या प्रस्तावित निर्मिती प्रकल्पाला जागा उपलब्ध करून देण्यासह महाराष्ट्र सरकारच्या वतीने सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

कॅप्टन अमोल यादव यांनी मोठय़ा कष्टाने भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. त्यांचे प्रात्यक्षिकदेखील यशस्वी झाले आहे. यापुढे नागरी उड्डाण मंत्रालयाची (डीजीसीए) मान्यता मिळाल्यानंतर त्यांना हा प्रकल्प उभारण्यासाठी जागा  देण्यासह उद्योग विभागाच्या वतीने सर्व सहकार्य केले जाईल. त्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊ असेही देसाई म्हणाले. उद्योगांसाठी दिले जाणारे प्रोत्साहन कॅप्टन अमोल यांच्या प्रकल्पाला दिले जाईल, असेही उद्योगमंत्री म्हणाले.

एका मराठी माणसाने विमान तयार करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरविले आहे, त्याचा सर्वांना अभिमान आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकल्पाचे कौतुक केले आहे. यापुढे देखील राज्य शासन त्यांना सर्व सहकार्य करेल, असे उद्योगमंत्री देसाई म्हणाले.

दातार यांना उद्योग स्थापण्यासाठी आमंत्रण

दुबईस्थित मसाला क्षेत्रातील उद्योजक धनंजय दातार यांनी करोनाकाळात तेथे अडकलेल्या ३८०० लोकांना भारतात परत जाता यावे यासाठी मदत करत आर्थिक भार उचलला. महाराष्ट्रातील ४०० कामगारांना त्याचा लाभ मिळाला यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दातार यांच्याशी संपर्क  साधत आभार मानले. तसेच कृषी प्रक्रि या उद्योगात गुंतवणुकीसाठी राज्यात मोठी संधी असून प्रकल्प उभारण्याचा विचार करावा, असे आमंत्रणही त्यांनी दातार यांना दिले.