गोदरेज अप्लायन्सेसने पुण्याजवळील शिरवळ आणि पंजाबमधील मोहाली या दोन ठिकाणच्या घरगुती उपकरणे उत्पादन प्रकल्पांमध्ये विस्तार करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी अंदाजे २०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असलेल्या याबाबतच्या ‘ब्राऊनफिल्ड’ प्रकल्पांमुळे दोन्ही ठिकाणी कंपनीच्या वातानुकूलित यंत्र,  वॉिशग मशीन तसेच रेफ्रिजरेटर यांचे उत्पादन वाढण्यास सहकार्य होणार आहे.
केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेवर अधिक भर देताना गोदरेज समूहाने भारतीय घरगुती उपकरणांच्या उत्पादनामध्ये विस्तार करण्यासाठी आणि आयातीवरील देशाचे अवलंबित्व कमी करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते.
गोदरेज अप्लायन्सेसचे व्यवसायप्रमुख कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी यांनी सांगितले की, समूहाच्या सध्याच्या विस्तार योजनेमार्फत सर्वोत्तम भारतीय आरेखन आणि उत्पादन कौशल्याची क्षमता दर्शवून गोदरेज ही नाममुद्रा अधिक उंचीवर नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. प्रस्तावित विस्तारामुळे आम्हाला ग्राहकांकडून असलेली वाढती मागणी पूर्ण करता येईल आणि अधिक परिसरात आमचा व्यवसाय विस्तारता येईल.
शिरवळ आणि मोहाली या दोन्ही ठिकाणचे उत्पादन प्रकल्प आपापल्या परिसरात मानाचे समजले जातात. गोदरेज अप्लायन्सेसने हायड्रोकार्बन रेफ्रिजरंटचा वापर करून पूर्णत: हरित वातानुकूलित यंत्रणा निर्माण करणारा जगातील पहिला उत्पादन प्रकल्पही स्थापन केला आहे.