आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दराने गेल्या पाच वर्षांतील तळातून उभारले असले तरी भारतीय बाजारपेठेत मात्र मौल्यवान धातूच्या दरातील नरमाईने गेल्या दोन वर्षांतील नवा नीचांक मंगळवारी गाठला.
मुंबईच्या सराफा बाजारात सोने दर आठवडय़ाच्या दुसऱ्या व्यवहारात १० ग्रॅमसाठी १३० रुपयांनी घसरले. परिणामी ते आता २५ हजारानजीक, २५,१२० रुपयांवर आले आहे. स्टॅण्डर्ड सोने दरांमध्ये ही स्थिती असताना शुद्ध सोन्याचा तोळ्यासाठीचा दरही याच प्रमाणात कमी होत तो २५,२७० रुपयांवर आला.
सोने – चांदीच्या दरांमध्ये सोमवारीही मोठय़ा प्रमाणातील घसरण नोंदली गेली होती. त्यामुळे त्याने २०१३ नंतरचा तळ गाठला होता. तो मंगळवारच्या नव्या घसरणीने अधिक तळात गेला.
मंगळवारी पांढऱ्या धातू दरांमध्ये मात्र वाढ नोंदली गेली. चांदीच्या किलोच्या दरामध्ये ७५ रुपयांनी वाढ होत हा धातू सोमवारच्या ३४,५०० च्या पुढे, ३४,७२५ रुपयांपर्यंत पोहोचला.
अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हमार्फत व्याजदर वाढीच्या शक्यतेने मौल्यवान धातूच्या दरांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरण दिसत आहे. चालू वर्षांत आतापर्यंत सोने ६.५ टक्क्यांनी घसरले आहे. त्यातच चीनने देशाकडे मुबलक सोने साठा असल्याने त्याच्या खरेदीचा मोह टाळण्याचा निर्णय घेतल्यानेही दरांमध्ये सोमवारपासूनच कमालीची घसरण नोंदली जात आहे.
लंडनच्या बाजारात सोने दराने सोमवारी गेल्या पाच वर्षांचा तळ अनुभवताना प्रति औन्स १,१०० नजीकचा भाव गाठला होता. सोने दर यावेळी मार्च २०१० च्या समकक्ष पातळीवर येऊन ठेपले होते.
मंगळवारी मात्र ते काहीसे सावरले. ही गेल्या सात दिवसातील पहिली उभारी होती. लंडनच्या बाजारात सोने प्रति औन्स एक टक्क्याने उंचावत १,१०७.७५ डॉलर्रपत पोहोचले. याचबरोबर चांदीच्या दरांमध्येही मंगळवारी लंडन बाजारात एक टक्क्यांची वाढ अनुभवली गेली. येथे चांदी सोमवारी प्रति औन्स १४.८५ डॉलपर्यंत खाली येताना डिसेंबरनंतरच्या तळात विसावली होती.