मौल्यवान धातूचा मासिक तळ जगभरात सर्वत्र पडझड

दिवाळसण सुरू होण्यास दोन दिवस शिल्लक असतानाच शहरात सोने बुधवारी लक्षणीय दर घसरणीसह अनोख्या किंमत टप्प्यापासूनही ढळताना अनुभवले गेले. तोळ्यासाठी सोने २६ हजारांखाली उतरताना महिन्याच्या तळात स्थिरावले.
राजधानीतही सोने २६,५०० च्या खाली येत महिन्याच्या तळात विसावले. भारतातील मौल्यवान धातूच्या घसरणीस आंतरराष्ट्रीय दर आपटीचा परिणाम झाला. अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हद्वारे आर्थिक तसेच पतधोरणाबाबतच्या वक्तव्याची प्रतीक्षा असतानाच जगभरात मौल्यवान धातूच्या दरांमध्ये आपटी नोंदली गेली.
सोन्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ म्हणून मानले जाणाऱ्या युरोपात सोन्याचे दर प्रति औन्स प्रथमच १,२०० डॉलरवरून खाली आहेत. आता तर ते औन्समागे १,११७ डॉलपर्यंत येऊन ठेपले आहेत. याचा परिणाम देशांतर्गत धातू मूल्यावरही जाणवला.
मुंबई सराफा बाजारात स्टॅण्डर्ड प्रकारच्या सोन्याचा दर (९९.५ शुद्धता) प्रति १० ग्रॅम ३२५ रुपयांनी कमी होत २५,९५० या २६ हजाराच्या काठावर विसावले. तर ९९.९ शुद्धतेच्या, शुद्ध सोन्याचा दर प्रति १० गॅ्रमसाठी त्याच प्रमाणात कमी होत २६ हजाराच्या काहीसा वर, २६,१०० पर्यंत गेला. चांदीचा किलोचा दर १२० रुपयांनी रोडावत मंगळवारच्या ३६,५७० वरून ३६,४५० रुपयांवर आला.
मौल्यवान धातू दराने नुकत्याच संपलेल्या दसऱ्याला फारशी चमक दाखविली नव्हती. भारतासाठी ओणम, गणेशोत्सव हे सण-समारंभाचा हंगाम सुरू करणाऱ्या कालावधीतही सोने तसेच चांदीच्या दरांमध्ये उठाव नव्हता. मौल्यवान धातूकडे असलेला हौशी खरेदीदारांचा ओढा नसतानाच त्याकडे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर व्याज देऊ शकणाऱ्या योजना सादर केल्या आहेत.

जागतिक सोने बाजारपेठेत भारत हा मौल्यवान धातूचा मोठा खरेदीदार देश राहिला आहे. जानेवारी ते सप्टेंबर या २०१५ च्या पहिल्या नऊ महिन्यांत देशाने ६४२ टन सोने खरेदी केले आहे. तर पहिल्या तिमाहीत सोने दागिने उलाढाल ही १९३ टन राहिली आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत ते घसरले आहे. किमती घसरण्याला कारणीभूत हाही एक घटक आहे.
’ मोहित कम्बोज
अध्यक्ष, इंडिया बुलियन अ‍ॅण्ड ज्वेलरी असोसिएशन