आंतरराष्ट्रीय बाजारात गुरूवारी सोन्याच्या भावानं पाच वर्षांमधला उच्चांक गाठला आहे. येत्या काळामध्ये अमेरिकेत व्याजदरांमध्ये कपात होण्याचे संकेत मिळाले असून त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणुकीला पसंती दिल्याचे दिसत आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव वधारले असून त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारात दिसणार आहे.
भारतीय वेळेनुसार आज गुरूवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याच्या भावानं 39 डॉलर्स प्रति औंस अशी उसळी मारली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,387 डॉलर्स प्रति औंस झाला आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हनं व्याजदर स्थिर ठेवताना येत्या काळात आर्थिक प्रगतीचा विचार करून निर्णय घेण्याचे घोषित केले. त्यामुळे व्याजांचे दर कमी होण्याचे संकेत मिळाले व सोन्यामध्ये गुंतवणूक वाढली. त्याचप्रमाणे अमेरिका व चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळेही मे महिन्यात सोन्याच्या भावांनी आठ टक्क्यांची वाढ बघितली होती.
भारतामध्ये दरवर्षी सुमारे 500 ते 600 टन इतक्या सोन्याची आयात होते. जर सोन्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले तर परिणामी खरेदीत घट होऊन आयातही तुलनेने घटण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारातही गुरूवारी सकाळी या आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचे पडसाद उमटले असून सकाळी सोने व चांदी दोन्ही वधारले आहेत. एससीएक्सवर प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 797 रुपयांनी वधारून 33,876 रुपये झाला. चर चांदीचा भाव प्रति किलो 843 रुपयांनी वधारून 38,147 रुपये झाला. याचा थेट परिणाम सराफा दुकानांमधील सोन्या-चांदीच्या भावावर होऊन तेदेखील वधारत आहेत. सोन्याचा भाव 34,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.