देशातील पहिल्या तरंगत्या नैसर्गिक वायू पुनर्भरण प्रकल्पाचे उद्घाटन

हिरानंदानी समूहातील एच-एनर्जी गेटवे या कंपनीतर्फे रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे उभारण्यात आलेल्या नैसर्गिक वायू प्रकल्पामुळे दाभोळच्या वीजनिर्मिती प्रकल्पाला नैसर्गिक वायूचा नियमित पुरवठा होऊन तेथे बारमाही वीजनिर्मिती होईल, असा विश्वास मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला.

देशातील या पहिल्याच तरंगत्या नैसर्गिक वायू पुनर्भरण प्रकल्पामध्ये परदेशातून अन्य जहाजांद्वारे येणारा नैसर्गिक वायू जयगड येथील जेएसडब्ल्यूच्या बंदर परिसरात एच-एनर्जीने भाडे करारावर घेतलेल्या जहाजावरील साठवण टाक्यांमध्ये उतरवून घेतला जाणार आहे. अशा प्रकारे सुमारे साडेचार हजार टन वायू साठवण्याची या टाक्यांची क्षमता असून तेथे प्रक्रिया करून कंपनीतर्फे टाकल्या जात असलेल्या नलिकेवाटे देशाच्या अन्य भागांमध्ये पाठवण्यात येणार आहे. जयगड येथील जेएसडब्ल्यूच्या बंदरातील जेटी आणि अन्य सेवांचा त्यासाठी भाडेतत्त्वावर वापर केला जाणार आहे.

या प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दाभोळ येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवरमध्ये वीजनिर्मितीचे काम पावसाळ्यात नैसर्गिक वायूच्या पुरवठय़ाअभावी बंद राहते. कारण त्या काळात तेथील जेटीवर जहाजे येऊ शकत नाहीत, पण जयगडचे बंदर बारमाही असून एच-एनर्जीतर्फे येथे उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पामध्ये प्रक्रिया केलेला नैसर्गिक वायू दाभोळसह राज्याच्या विविध भागांमध्ये बंद नलिकेवाटे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे दाभोळ प्रकल्पासाठी नैसर्गिक वायूचा नियमितपणे पुरवठा होऊन तेथे अखंडितपणे वीजनिर्मिती होऊ शकेल.

अवघ्या १७ महिन्यांच्या कालावधीत हा प्रकल्प उभा करणाऱ्या एच-एनर्जीचे व्यवस्थापकीय संचालक दर्शन हिरानंदानी यांचे विशेष कौतुक करून फडणवीस म्हणाले की, येथे उपलब्ध होणारा नैसर्गिक वायू उद्योग, वाणिज्य आणि घरगुती वापर या तिन्हीसाठी वापरला जाणार आहे. प्रदूषणरहित ऊर्जा, ही देशाची गरज भागवण्यासाठी या प्रकल्पाचे महत्त्वाचे योगदान राहील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, प्रसाद लाड, हिरानंदानी समूहाचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, जिंदाल उद्योगसमूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल इत्यादी कार्यक्रमाला उपस्थित होते.

रत्नागिरीत नलिकेद्वारे घरगुती गॅस

दरम्यान, या औपचारिक कार्यक्रमापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत निरंजन हिरानंदानी म्हणाले की, पर्यावरणस्नेही ऊर्जेच्या प्रसारासाठी एच-एनर्जी प्रयत्नशील असून हा प्रकल्प त्याचाच भाग आहे. सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा कमीत कमी किमतीत उपयोग येथे करण्यात आला आहे. वाहने किंवा औद्योगिक क्षेत्राप्रमाणेच घरगुती वापरासाठी बंद नलिकेद्वारे गॅसपुरवठा करण्याची आमची योजना आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात सीएनजीचे जाळे उभारत असलेल्या युनिसेल कंपनीला या वायूचा मुबलक प्रमाणात पुरवठा केला जाणार आहे.