गृहवित्त क्षेत्रातील आघाडीच्या ‘एचडीएफसी’ने आपल्या घरांसाठी कर्जाचे दर हे ०.२० टक्क्य़ांपर्यंत वाढविण्याचा सोमवारी सायंकाळी निर्णय घेतला. रिझव्‍‌र्ह बँकेने ताजे पतधोरण मांडताना, व्याजाचे दर जैसे थे ठेवले असले तरी, रोकड तरलतेच्या अभावी वाणिज्य बँकांनाही कर्जावरील व्याज दर वाढवावे, असे संकेत आहेत.

एचडीएफसीने किरकोळ प्रधान ऋण दरातील (आरपीएलआर) ही वाढ १ एप्रिलपासून लागू करीत असल्याचे म्हटले आहे. ही व्याजदर वाढ किमान ०.०५ टक्के ते कमाल ०.२० टक्क्य़ांदरम्यान म्हणजे कमी रकमेच्या गृहकर्जावर किमान तर अधिक रकमेच्या गृहकर्जावर कमाल अशा तऱ्हेने लागू झाली आहे.

महिला कर्जदारांना ३० लाखांपेक्षा कमी रकमेच्या कर्जासाठी आता ८.३५ टक्क्य़ांऐवजी ८.४० टक्के व्याजदर लागू होईल, तर इतरांना ८.४५ व्याज दराने कर्ज घ्यावे लागेल. ३० लाख ते ७५ लाखांदरम्यान घरासाठी कर्ज महिलांना ८.५५ टक्के दराने तर इतरांना ८.६० टक्के, तर ७५ लाख रुपयांवरील कर्ज महिलांसाटी ८.६५ टक्के दराने तर इतरांसाठी ८.७० टक्के दराने उपलब्ध केले जाईल.