‘सोशल नेटवर्किंग साइट’च्या माध्यमातून दीड वर्षांत २४ लाखांहून अधिक ‘फॅन’ मिळविणाऱ्या आयसीआयसीआय बँकेने आता या माध्यमाचा उपयोग विशेषत: तरुण वर्गासाठी आणि त्यांच्या वित्तीय गरजा भागविण्यासाठी करून घेण्याचे ठरविले आहे. आघाडीच्या खासगी बँकेने ‘फेसबुक’च्या व्यासपीठावर स्वतंत्र ‘अ‍ॅप्लिकेशन’ सुरू केले असून या माध्यमातून बँकेच्या ७० लाख खातेदारांना मित्रांना पैसे पाठविण्यासह, मोबाइल रिचार्ज, सिनेमाची तिकिटे उपलब्ध करून दिली आहेत.
‘पॉकेट बाय आयसीआयसीआय बँक’ या उपक्रमांतर्गत बँकेने तिच्या तरुण खातेदारांना ‘फेसबुक’द्वारे त्यांच्या मित्रांच्या बँक खाते क्रमांक आदी तांत्रिक माहिती नसतानाही केवळ ई-मेल, मोबाइल क्रमांकाच्या आधारे पैसे पाठविता येणार आहेत. याशिवाय पैशाबाबतचे व्यवहार मित्रांमध्ये ‘शेअर’ करण्याचीही सुविधा आहे. मिनी स्टेटमेंट, क्रेडिट कार्डाचा तपशील, तसेच धनादेश पुस्तिका मागविणे, धनादेश रोखणे आदी सेवाही याअंतर्गत करता येणार आहेत.
‘फेसबुक’च्या संकेतस्थळावरील ‘पॉकेट’ उपक्रमाची घोषणा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी मंगळवारी वांद्रे – कुर्ला संकुलातील मुख्यालयात केली. ग्राहकांच्या सुलभ व्यवहारासाठी ही सुविधा सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट करत कोचर यांनी या वेळी ‘पॉकेट’साठी ‘फेसबुक’ हे केवळ व्यासपीठ असून तांत्रिक तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बाबी बँकेमार्फत हाताळली जाणार आहेत, असेही सांगितले.
बँकेने सर्वप्रथम जानेवारी २०१२ मध्ये फेसबुकचे साहाय्य घेतले होते. आतापर्यंत त्याचे २४ लाख पसंतीधारक आहेत. तर बँकेने ‘आय विश’ या सुरू केलेल्या अन्य तांत्रिक व्यासपीठाचेही तूर्त ७५ हजार धारक बनले आहेत.
नव्या उपक्रमाचा लाभ बँकेचे ७० लाखांहून अधिक ३५ वर्षांखालील तरुण ग्राहक घेतील, अशा विश्वास या वेळी बँकेच्या तांत्रिक विभागाच्या सरव्यवस्थापक अबोन्ती बॅनर्जी यांनी व्यक्त केला. कोणतेही अतिरिक्त शुल्कविरहित या सेवेसाठी दिवसाला १० हजार रुपयांचे व्यवहार व कार्यालयीन कामकाजाच्या वेळा याच्या मर्यादा असतील.

‘सोशल नेटवर्किंग’चा पहिला आधार..
देशातील आघाडीची खासगी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने तांत्रिकतेचा उपयोग भारतीय बँकिंग क्षेत्रात सर्वप्रथम केला. ९०च्या दशकात एटीएम आणल्यानंतर १९९७ मध्ये इंटरनेट बँकिंग सुरू केले. २०१२ पासून इलेक्ट्रॉनिक प्रणालीवर अविरत शाखा चालविणाऱ्या या बँकेने ‘फेसबुक’चे माध्यमही सुरू केले व आता त्याच व्यासपीठावर खऱ्या अर्थाने आर्थिक व्यवहार करणारी पहिली बँक ठरली आहे.

इंटरनेटचा भारतीयांमध्ये वाढता वापर
इंटरनेटधारकांमध्ये भारत हा जगातील तिसरा मोठा देश असून त्यांची संख्या १३.७० कोटी आहे. पैकी ८६ टक्के लोक सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करतात. सध्या भारतीय फेसबुकधारक ८.२ कोटी असून २०१५ पर्यंत ती ३० कोटी होणार आहे. वर्षांला ३० टक्के फेसबुकधारकांमध्ये वाढ होत आहे. एकूण फेसबुकधारकांपैकी ४० टक्के हे ३५ वयोगटाखालील आहेत. दिवसाला ३ तास ६१ मिनिटे फेसबुकवर व्यतीत करणारे आहेत.