जवळपास वर्षभर उपभोगलेली उत्पादन शुल्कातील सवलत डिसेंबर २०१४ अखेर संपुष्टात आली, पण तिने वाहन उद्योगाच्या विक्रीवर जसे अंदाजले जात होते तसा विपरित परिणाम मात्र केलेला नाही. सरलेल्या जानेवारी २०१५ महिन्यातील वाहन विक्रीतील वाढीने हे स्पष्ट झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे टाटा मोटर्सचा प्रवासी वाहन विक्री वाढली तर ह्य़ुंदाईचा नकारात्मक प्रवास या वर्षांरंभाला नवे वळण देणारा ठरला आहे.
देशातील दुसऱ्या क्रमांकाची व निर्यातीत पहिली असलेल्या मुळच्या कोरियन ह्य़ुंदाई मोटर इंडियाला यंदा किरकोळ घसरणीला सामोरे जावे लागले आहे. कंपनीने गेल्या महिन्यात १.४ टक्के कमी वाहन विक्री केली. कंपनीच्या जानेवारीत ४४,७८४ वाहनांची विक्री झाली. वर्षभरापूर्वी ती ४५ हजारांवर होती. गेल्या महिन्यात कंपनीची निर्यातही १६.७ टक्क्यांनी घसरली आहे. ती वर्षभरापूर्वीच्या १२ हजारांवरून यंदा १० हजार झाली आहे.
असाच काहीसा अनोखा प्रवास टाटा मोटर्सने यंदा नोंदविला आहे. कंपनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घसरण नोंदवित आहे. यंदा मात्र कंपनीच्या वाहन विक्रीत वाढ झालेली दिसली. कंपनीच्या वाहन विक्रीत किरकोळ, ५.१९ टक्के मात्र वाढ नोंदली गेली आहे. कंपनीने जानेवारीमध्ये ४२,५८२ वाहनांची विक्री केली आहे. यामध्ये वाणिज्यिक वाहनांचाही समावेश आहे. तर केवळ प्रवासी वाहनांची विक्री थेट १८.८९ टक्क्य़ांनी वाढून १०,९७४ झाली आहे. वाणिज्यिक वाहन विक्री स्थिर तर निर्यात केवळ ३.५ टक्क्य़ांनी वाढली आहे.
महिंद्र समुहातील प्रवासी, व्यापारी तसेच ट्रॅक्टर विक्रीत जानेवारीमध्ये घसरण नोंदली गेली आहे. कंपनीच्या प्रवासी विभागाचा घसरणीचा प्रवास गेल्या काही महिन्यांपासून कायम आहे. मात्र ट्रॅक्टर विक्रीतील घसरण यंदा एकूणच समुहासाठी लक्षणीय ठरली आहे.
कंपनीच्या प्रवासी वाहनांची विक्री यंदा ६ टक्क्य़ांनी घसरून ३९,९३० झाली आहे. जानेवारी २०१४ मध्ये ती ३७,०४५ होती. स्कॉर्पिओ, एक्सयूव्ही५००, झायलो, बोलेरो या पसंतीच्या वाहनांची मागणीही कमी झाली आहे.
कंपनीच्या वाणिज्यिक वापराची वाहने गेल्या महिन्यात १४ टक्क्य़ांनी घसरली तर निर्यात मात्र २२ टक्क्य़ांनी उंचावली आहे. ही संख्या अनुक्रमे १२,९१९ व २,८८५ झाली आहे. कंपनीच्या ट्रॅक्टरची विक्रीही यंदा तब्बल २६ टक्क्य़ांनी कमी झाली आहे. यंदा १४,९१३ ट्रॅक्टर विकले गेले आहेत.