मुंबई : दुसऱ्या लाटेतून सावरत असलेल्या देशात कोविड-प्रतिबंधक लसीकरणाला प्रोत्साहन देण्याचा अभिनव प्रयोग सार्वजनिक क्षेत्रातील काही बँकांनी अनुसरला आहे. ठरावीक कालावधीसाठी आणलेल्या या योजनांमध्ये लसीकरण केलेल्या नागरिकांना मुदत ठेवींवर वाढीव व्याज दिले जाणार आहे.

लसीची एक मात्रा जरी घेतली असेल तर अशा ग्राहकांना युको बँकेने ९९९ दिवसांच्या मुदत ठेवींवर ३० आधार बिंदू अर्थात ०.३० टक्के अतिरिक्त व्याज लाभ देऊ केला आहे. ‘युकोव्ॉक्सी-९९९’ नावाची या योजनेत ग्राहकांना येत्या ३० सप्टेंबपर्यंत गुंतवणूक करता येईल.

मुंबईत मुख्यालय असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ‘इम्युन इंडिया ठेव योजना’ आणली असून, लस घेतल्याचे प्रमाणपत्र असणारे ग्राहक या योजनेतील ठेवींवर पाव टक्के (०.२५ टक्के) अतिरिक्त व्याज मिळवू शकतील. ही मुदत ठेव योजना १,१११ दिवसांच्या कालावधीची आहे. देशभरात सध्या जवळपास २४ कोटी नागरिकांनी लसीच्या पहिली अथवा दोन्ही मात्रा घेतल्या असून, ते सर्व बँकांकडून प्रस्तुत या अतिरिक्त व्याज लाभास पात्र ठरतील. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या धर्तीच्या योजना इतर बँकांकडून अनुसरल्या जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.