सत्राच्या आरंभी ५३० अंशांची उसळी घेतलेला सेन्सेक्स, मंगळवारचे बाजारातील व्यवहार संपताना मात्र २४३.६२ अंशांचे नुकसान सोसून ४७,७०५.८० या दोन महिन्यांपूर्वीच्या नीचांक स्तरावर गडगडला. भांडवली बाजारावर तेजी-मंदीवाल्यांची तुंबळ धुमश्चक्री सुरू असून, त्याचेच प्रत्यंतर म्हणून निर्देशांकांमध्ये मोठे चढ-उतार आणि अस्थिरता वाढत चालली आहे.

सेन्सेक्सने मंगळवारच्या व्यवहाराची सुरुवात ४८,४७८.३४ अशा उच्चांकावरून ५२९ अंशांच्या तेजीसह केली. निफ्टी निर्देशांकानेही १६७ अंशांच्या मुसंडीसह १४,५०० या भावनिकदृष्ट्या महत्त्वाच्या पातळीपुढे व्यवहार सुरू केला. मात्र दिवस सरत असताना, या निर्देशांकानेही विक्रीवाल्यांपुढे शरणागती पत्करून, ६३.०५ अंशांच्या नुुकसानीसह १४,२९६.४० वर विश्राम घेतला.

एके दिवशी चांगली मागणी मिळविणाऱ्या समभागांमध्ये, दुसऱ्या दिवशी विक्री होऊन नफावसुली असे चक्र बाजारात सध्या सुरू असल्याचे दिसून येते. मंगळवारच्या व्यवहारात अल्ट्राटेक सीमेंट, एचसीएल टेक, एचडीएफसी, टेक महिंद्र, एचडीएफसी बँक आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या समभागांवर विक्रीचा मारा होऊन, त्याचे मूल्य गडगडताना दिसून आले. त्या उलट बजाज फिनसव्र्ह, डॉ. रेड्डीज, बजाज फायनान्स, बजाज ऑटो, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र आणि मारुती हे समभाग वधारले. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांना विक्रीचा सर्वाधिक फटका बसला. त्या उलट, आरोग्यनिगा, भांडवली वस्तू, दूरसंचार या उद्योग क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदीचा जोर दिसून आला.

घसरण कशाने?

महाराष्ट्रात निर्बंध आणखी कठोर करून रुग्णवाढीला प्रतिबंध करण्यासाठी कडक टाळेबंदीच्या शक्यतेने विशेषत: उत्तरार्धातील व्यवहारात गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. परिणामी मंगळवारी सेन्सेक्स व निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी चांगली  सुरुवात केली, परंतु दिवस सरत गेला तशी त्यांना उतरती कळा लागली. करोनाच्या वाढत्या थैमानाने अर्थव्यवस्थेपुढे निर्माण केलेले अनिश्चिततेचे आव्हान पाहता, बाजारात गुंतवणूकदारांचे मनोबलही डगमगत चालले आहे.

मिड-स्मॉल कॅप सरस

लार्ज कॅप निर्देशांक गडगडले असताना, व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बीएसई मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकांची कामगिरी मात्र वाढ साधणारी सकारात्मक राहिली.