भांडवली बाजारातील निर्देशांक घसरण सलग तिसऱ्या सत्रातही कायम राहिली. जागतिक भांडवली बाजारातील निराशाजनक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर येथेही बँक तसेच वित्त क्षेत्रातील समभागांची विक्री अधिक प्रमाणात झाली.

डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण तसेच विदेशी गुंतवणूकदारांमार्फत होणारे समभाग विक्री धोरण याचाही विपरीत परिणाम बाजारात दिसून आला. सत्रातील मोठ्या आपटीनंतर अखेर ३१.१२ अंश घसरणीने सेन्सेक्स ५०,३६३.९६ वर स्थिरावला. तर १९.०५ अंश घसरणीमुळे निफ्टी १४,९१०.४५ पर्यंत बंद झाला.

गेल्या सलग दोन व्यवहारांतील घसरणीनंतर दोन्ही प्रमुख निर्देशांकांची मंगळवारच्या सत्राची सुरुवात काहीशी तेजीने झाली होती. मात्र दुपारपर्यंत सेन्सेक्स तसेच निफ्टीत मोठी घसरण नोंदली गेली. सत्रअखेरही निर्देशांकांचा उतरता क्रम कायम होता. मात्र व्यवहारातील निर्देशांक आपटीपेक्षा तो कमी होता. सप्ताहारंभीच्या तुलनेत दोन्ही प्रमुख निर्देशांक जवळपास ०.१५ टक्क्यापर्यंत घसरले.

सेन्सेक्समधील प्रमुख ३० कंपनी समभागांमध्ये लार्सन अँड टुब्रो सर्वाधिक, १.५६ टक्के घसरणीसह अग्रणी राहिला. त्याचबरोबर आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, एचडीएफसी लिमिटेड, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्र बँक, बजाज फिनसव्र्ह अशा बँक व वित्त क्षेत्रातील समभागही घसरले.

एशियन पेंट्स, डॉ. रेड्डीज्, हिंदुस्थान यूनिलिव्हर, एचसीएल टेक, टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट तेजीच्या यादीत राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद, स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू एक टक्क्यापर्यंत घसरले. तर माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार क्षेत्राला मागणी राहिली.