नवी दिल्ली : देशातील औद्योगिक उत्पादनाची घसरती वाटचाल एकूण आर्थिक मंदीच्या दिशेने सुरू असल्याचे ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. भारताचा औद्योगिक उत्पादन दर यंदाच्या जुलैमध्ये ४.३ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.

वर्षभरापूर्वी, जुलै २०१८ मध्ये प्रकल्पातील उत्पादनाचे मापक असलेला औद्योगिक उत्पादन दर ६.४ टक्के होता. तर आधीच्या महिन्यात, जून २०१९ मध्ये हा दर १.२ व मे २०१९ मध्ये तो ४.६ टक्के नोंदला गेला आहे.

सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी खात्याने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जुलै या चालू वित्त वर्षांच्या पहिल्या चार महिन्यांत औद्योगिक उत्पादन दर ३.३ टक्के नोंदला गेला आहे. वर्षभरापूर्वी, याच कालावधीत हा दर ५.४ टक्के होता.

यंदा घसरलेला औद्योगिक उत्पादन दर एकूणच देशातील निर्मिती क्षेत्रातील हालचाल मंदावल्याचे स्पष्ट करत आहे. एकूण निर्मिती क्षेत्र वर्षभरापूर्वीच्या ७ टक्क्यांवरून यंदाच्या जुलैमध्ये ४.२ टक्क्यांवर स्थिरावले आहे.

भांडवली वस्तू क्षेत्राचा प्रवासही उणे ७.१ टक्क्यांवर आला आहे. तर खनिकर्म क्षेत्राची वाढ काही प्रमाणात वाढून ४.९ टक्के झाली आहे. ऊर्जानिर्मिती मात्र किरकोळ घसरत ४.८ टक्क्यांवर पोहोचली आहे.

जुलै २०१९ मध्ये प्राथमिक वस्तूच्या निर्मितीतील वाढ ३.५ टक्के, पायाभूत तसेच बांधकाम साहित्यातील उत्पादन निर्मिती २.१ टक्क्याने वाढली आहे. ग्राहकोपयोगी वस्तू निर्मिती उणे स्थितीत (२.७ टक्के) राहिली आहे.

सर्व गटात निर्मित खाद्यान्न वस्तू क्षेत्राने जुलैमध्ये सर्वाधिक, २३.४ टक्के वाढ यंदा नोंदविली आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात समाविष्ट एकूण २३ उद्योगांपैकी १३ उद्योग क्षेत्रातील निर्मिती वेग यंदा मंदावला आहे.