जगातील साखर उत्पादनांत ७०% वाटा राखणारे विकसित देश हेच आजच्या घडीला साखरेच्या आणि तिच्या पूरक उत्पादनांच्या जागतिक व्यापारात महत्त्वाचे स्थान राखत असले तरी जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादन घेणाऱ्या भारतात साखर क्षेत्रात विशेषत: अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि ऊस शेतीच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावरून गुंतवणुकीला मोठा वाव आहे, असा सूर  ‘शुगर एशिया २०१४’ परिषदेत तज्ज्ञांकडून पुढे येताना दिसला.
इथनॉलनिर्मिती, मद्यनिर्मिती (डिस्टिलरी), वीजनिर्मिती, जैव ऊर्जा आणि उसाचे मळे वगैरे साखर उद्योगाशी निगडित सर्व अंगांमधील नवीन तंत्र, तंत्रज्ञान व सामग्रीचे आशिया खंडातील सर्वात मोठे प्रदर्शन म्हणून ख्याती असलेल्या ‘शुगर एशिया’च्या यंदाच्या सहाव्या आवृत्तीचे मुंबईत गुरुवारी अनावरण झाले. गोरेगाव (पूर्व) येथील मुंबई प्रदर्शन संकुलात या दोन दिवसांच्या प्रदर्शन व परिषदेचे आयोजन नेक्सजेन एक्झिबिशन्सने केले आहे. भारतासह अमेरिका, हॉलंड,जर्मनीसह२० देशांतील कंपन्या आणि त्यांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले आहेत.