अन्नधान्य किंमतीतील घसरणीचा सुपरिणाम

नवी दिल्ली : अन्नधान्याच्या किमती उतरल्यामुळे देशातील किरकोळ महागाईच्या दरात सरलेल्या डिसेंबरमध्ये घट दिसून आली. ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे मोजल्या जाणारा हा महागाई दर ४.५९ टक्के नोंदविण्यात आल्याचे सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले.

ऑक्टोबर २०२० मधील ७.६१ टक्के हा मे २०१४ नंतर कळसाचा स्तर गाठणारा किरकोळ महागाई दर, त्यानंतरच्या नोव्हेंबर महिन्यातही ६.९३ टक्के अशा चढय़ा स्तरावर होता.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे वर्षभरापूर्वी, डिसेंबर २०१९ मध्ये किरकोळ महागाई दर ७.३५ टक्क्य़ांवर होता. त्या तुलनेत यंदाच्या डिसेंबरसाठी नोंदविला गेलेला ४.५९ टक्के दर हा या आघाडीवरील मोठा दिलासाच ठरतो.

रिझव्‍‌र्ह बँकेने महागाई दराबाबत निर्धारित केलेल्या सहा टक्क्य़ांच्या वरच्या मर्यादेच्या आतच तो नोंदला गेला आहे.

अन्नधान्याच्या किमतीत झालेला लक्षणीय सुधार हे महागाई दरातील घसरणीचे प्रमुख कारण आहे. आधीच्या महिन्यांतील ९.५ टक्क्य़ांवरून डिसेंबर २०२० मध्ये अन्नधान्य महागाई दर ३.४१ टक्क्य़ांवर गडगडल्याचे उपलब्ध आकडेवारी स्पष्ट करते.

औद्योगिक उत्पादन उणे स्थितीत

नवी दिल्ली : देशाच्या कारखानदारीतील उत्पादकतेचे परिमाण मानले जाणाऱ्या ‘औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी)’च्या मंगळवारी जाहीर नोव्हेंबर २०२० च्या आकडेवारीने पुन्हा निराशा केली. नकारात्मकतेचा क्रम कायम राखत, तो नोव्हेंबर महिन्यात उणे १.९ टक्के नोंदला गेला आहे.

वर्षभरापूर्वी, नोव्हेंबर २०१९ मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक २.१ टक्के होता. निर्देशांकातील यंदाच्या संकोच हा प्रामुख्याने खाण आणि निर्मिती क्षेत्रातील नकारात्मकतेच्या परिणामी आहे. खाणकाम क्षेत्रात नोव्हेंबरमध्ये वार्षिक आधारावर उणे ७.३ टक्क्य़ांनी घसरण दिसून आली, तर निर्मिती क्षेत्रात उणे १.७ टक्क्य़ांची घट झाली. मात्र सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, वीजनिर्मिती क्षेत्र ३.५ टक्क्य़ांनी नोव्हेंबरमध्ये वाढले.

नोव्हेंबरमधील नकारात्मकतेची भर पडून, औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा आर्थिक वर्ष २०२०-२१ (एप्रिल ते नोव्हेंबर) मध्ये उणे १५.५ टक्के आक्रसला आहे. आधीच्या आर्थिक वर्षांतील याच आठ महिन्यांत या निर्देशांकात माफक का होईना, ०.३ टक्क्य़ांची सकारात्मक वाढ दिसून आली होती.