नवी दिल्ली : देशातील ई-कॉमर्स क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक धोरणात बदल होत असला तरी येथील गुंतवणुकीचे धोरण कायम असेल, असा विश्वास वॉलमार्ट या अमेरिकन कंपनीने व्यक्त केला आहे.

वॉलमार्टची भारतातील फ्लिपकार्टमधील मालकीच्या माध्यमातून थेट विदेशी गुंतवणूक आहे. फ्लिपकार्टमध्ये अमेरिकी कंपनीने गेल्याच वर्षी १६ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली. याकरिता वॉलमार्टने फ्लिपकार्ट खरेदी केली.

भारतात ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांना त्यांचे गुंतवणूकदार असलेल्या कंपन्यांची उत्पादने विकण्यावर निर्बंध घालण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे वॉलमार्ट कंपनी फ्लिपकार्टमधील गुंतवणूक काढून घेण्याविषयीची चर्चा सुरू झाली होती. त्या पाश्र्वभूमीवर वॉलमार्टनेच ही बाब स्पष्ट केली आहे. वॉलमार्ट एशिया व कॅनडाचे विभागीय मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी उपाध्यक्ष डर्क व्ॉन डेन बर्ग यांनी, देशातील व्यवसायाबाबत आपण आश्वासक असल्याचे म्हटले आहे. देशातील ई-कॉमर्स क्षेत्रातील नियमनांबाबत बदल झाला तरी आम्ही भारतात दीर्घकालीन गुंतवणूक व व्यवसाय धोरण कायम ठेवू, असेही त्यांनी नमूद केले.

एफडीआय धोरणाला पाठिंबा

ई-कॉमर्स क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीच्या नियमात सुधारणा या किरकोळ विक्रेत्यांच्या हितार्थ असल्याचे नमूद करत अनेकांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. इन्फोसिसचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी मोहनदास पै यांनी, याबाबत सरकारचा निर्णय म्हणजे योग्य दिशेने पडलेले पाऊल असल्याचे नमूद केले आहे. तर भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन देऊनही प्रत्यक्षात एफडीआयचा निर्णय झाला नसल्याचे नमूद करत केपीएमजी इंडियाच्या हितेश गजारिया यांनीही प्रस्तावित बदलाचे स्वागत केले.