देशभरात ४५ फंड घराणी असलेल्या क्षेत्राने प्रथमच १२ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचा टप्पा गेल्या महिन्यात पार केला आहे. सलग तिसऱ्या महिन्यात फंड मालमत्तेचा विक्रमी टप्पा सर करणाऱ्या या क्षेत्रात एकाच महिन्यात १८ हजार कोटी रुपयांची भर पडली आहे.

‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ने (अ‍ॅम्फी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीमधील म्युच्युअल फंड मालमत्ता १२,०२,१९६ कोटी रुपये झाली आहे. जानेवारी २०१५ मधील ११,८१,३५६ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत ती या महिन्यात उंचावली आहे. डिसेंबर २०१४ मध्ये ही मालमत्ता १०.५० लाख कोटी रुपयांहून अधिक होती.
भांडवली बाजारातील वाढत्या निधी ओघामुळे म्युच्युअल फंड मालमत्ताही वधारली असून बाजारातील मे २०१४ पासूनचा विदेशी गुंतवणूकदारांचा कल चढाच राहिला आहे. परिणामी प्रमुख निर्देशांकांनीही मार्चच्या पहिल्या आठवडय़ातच विक्रमी शिखर पादाक्रांत केले आहे. याच आशेवर फंड गुंतवणुकीतील किरकोळ गुंतवणूकदारांची पसंतीही वाढली आहे.
गेल्या महिन्यात एकूण वाढलेल्या १८ हजार कोटी रुपयांमध्ये लिक्विड श्रेणीमध्ये ८,७८४ कोटी रुपये तर इक्विटी गटामध्ये ५,२१७ कोटी रुपयांची भर पडली आहे.
इक्विटीनिगडित म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक ही मार्च २०१४ पासून डिसेंबर २०१४ दरम्यान २२ टक्क्य़ांवरून ३० टक्क्य़ांवर गेली आहे.
डेट संबंधित फंड योजनांमध्ये मात्र गुंतवणुकीत घसरण नोंदली गेली आहे. हे प्रमाण ५२ टक्क्य़ांवरून या कालावधीत ४५ टक्क्य़ांवर आले आहे.
चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत फंड मालमत्ता सप्टेंबर २०१४ मध्ये सर्वात कमी, ९,५९,४१५ कोटी रुपये राहिली आहे.
तर गेल्या आर्थिक वर्षांच्या अखेरच्या महिन्यात ती ८,२५,२४० कोटी रुपयांवर येऊन ठेपली होती. २०१४-१५ मध्ये फेब्रुवारीपर्यंत आठ महिने ही मालमत्ता महिन्याला १० लाख कोटी रुपयांच्या वरच राहिली आहे.

5

घसरणीतही वधारले..
जवळपास दोन टक्क्य़ांहून अधिकच्या प्रमुख निर्देशांक आपटीतही सोमवारी उल्लेखनीय समभाग कमालीचे उंचावले. कमी मूल्यातील अशा समभागांकरिता गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीचा जोर निवडक समभागांना दिवसअखेरही तेजी नोंदविण्यास भाग ठरला.
* सन फार्मा समूहातील स्पार्क समभागाने सप्ताहारंभी पुन्हा एकदा उचल खाल्ली. सत्रात १९.३१ टक्क्य़ांनी वाढणारा हा समभाग दिवसअखेर १५ टक्के वाढीसह ५४४.९० रुपयांवर स्थिरावला. परिणामी कंपनीचे बाजारमूल्य एकाच व्यवहारात १,६८५ कोटी रुपयांनी वाढले.
* छत्तीसगडमध्ये कोळसा खाणी प्राप्त झाल्याच्या वृत्तावर जिंदाल समूहातील स्टील अ‍ॅन्ड पॉवर कंपनीचा व्यवहारा दरम्यान ८.३३ टक्क्य़ांची उसळी घेणारा समभाग दिवसअखेर ४.७७ टक्के वाढीसह १९४.३० रुपयांवर स्थिरावला.
* माल वाहतूक क्षेत्रातील आघाडीच्या कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा समभाग सत्रात दुहेरी आकडय़ाने मजल मारल्यानंतर अखेर ७.७८ टक्के झेपसह १,६०४.०५ वर येऊन थांबला. कंपनीला रिझव्‍‌र्ह बँकेने ३४ टक्क्य़ांपर्यंत विदेशी गुंतवणूक करण्यास करण्यास मान्यता दिल्याची ही पावती होती.

रुपया दोन महिन्याच्या तळात
अमेरिकी चिंता भांडवली बाजाराप्रमाणेच परकी चलन व्यवहारावरही सोमवारी उमटली. डॉलरच्या तुलनेत रुपया सप्ताहारंभी ३९ पैशांनी घसरत थेट ६२.५५ पर्यंत खाली आला. स्थानिक चलनाचा हा गेल्या दोन महिन्यातील नीचांक होता. अमेरिकेतील रोजगार आकडेवारी अपेक्षेपेक्षा उत्तम राहूनही फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याजदर वाढीच्या भितीने भांडवली बाजाराप्रमाणेच परकी चलन व्यासपीठावरही धास्ती निर्माण झाली.
नव्या आठवडय़ाची सुरुवातच ६२.६० अशी किमान स्तरावर करणारा रुपया व्यवहारात ६३.२० पर्यंत ढासळला. सत्रअखेर स्थिरावलेला त्याचा किमान स्तर हा ८ जानेवारीनंतरचा होता. सत्रात काहीसा उंचावत ६२.५३ पर्यंत सावरल्यानंतर त्यात शुक्रवारच्या तुलनेत मात्र ०.६३ टक्क्य़ांची घसरण झाली. ‘व्हेरासिटी ग्रुप’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमित ब्रह्मभट्ट यांनीही चलनाचा प्रवास ६२ ते ६३ दरम्यान राहण्याची शक्यता वर्तविली आहे.
6