मुंबई : तुर्की अर्थव्यवस्थेच्या चिंतेने स्थानिक रुपयाला सोमवारी ऐतिहासिक तळाला सामोरे जावे लागले. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आठवडय़ाच्या पहिल्याच व्यवहारात तब्बल १.०८ रुपयाने (१.५७ टक्के) खाली आले. परकी चलन विनिमय मंचावर रुपया अखेर शुक्रवारच्या तुलनेत ६९.९१ पर्यंत खाली आला.

चलनाचा ७० च्या हा आतील मूल्यप्रवास प्रथमच नोंदला गेला. भांडवली बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचे दुर्लक्ष आणि खनिज तेलाच्या दरांचा विपरित परिणाम स्थानिक चलनावर झाल्याचे निरिक्षण बाजारतज्ज्ञांनी नोंदविले. चलनाची सोमवारच्या एकाच व्यवहारातील आपटी ही गेल्या पाच वर्षांतील सर्वात मोठी आपटी ठरली. रुपया यापूर्वी ऑगस्ट २०१२ मध्ये एकाच सत्रात तब्बल २.४ टक्क्य़ांनी (१.४८ रुपयाने खाली आला होता.)

तुर्की अर्थव्यवस्थेवरील अमेरिकेच्या दुप्पट आयात शुल्काच्या माऱ्यामुळे तुर्की चलन असलेल्या लिराचेही अवमूल्यन झाले. हे चलन सोमवारी १२ टक्क्य़ांपर्यंत खाली आले आहे. शुक्रवारीही त्यात टक्केवारीच्या बाबतीत दुहेरी अंकापर्यंत आपटी नोंदली गेली होती.

भांडवली बाजारावर तुर्की अर्थसंकट

सेन्सेक्स, निफ्टीत सप्ताहारंभी घसरण; विदेशी गुंतवणूक संस्थांचाही काढता पाय

जागतिक स्तरावर आर्थिक मंदीबाबत तुर्कीच्या रूपात नवे संकट उदयास येत असून त्याचा भारतीय बाजारावरील परिणाम व्यवहाराच्या आठवडय़ातील पहिल्याच दिवशी दिसून आला. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्यही ७० पर्यंत घसरले.

व्यवहारात शुक्रवारच्या तुलनेत ३०० अंशांची आपटी अनुभवणारा सेन्सेक्स दिवसअखेर २२४.३३ अंश घसरणीसह ३७,६४४.९० पर्यंत खाली आला. तर ७३.७५ अंश नुकसानासह राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ११,४०० चा टप्पा सोडताना ११,३५५.७५ वर स्थिरावला.

मुंबई निर्देशांक पंधरवडय़ाच्या तळात येऊन विसावला. तर रुपया ऐतिहासिक नीचांक नोंदविता झाला.

अमेरिका-चीन व्यापारयुद्धाचा रोख आता अमेरिका-तुर्कीकडे असलेला पाहून गुंतवणूकदारांनीही चिंता व्यक्त केली. भांडवली बाजारात विशेषत: वित्त, बँक क्षेत्रातील समभागांची जोरदार विक्री झाली. त्याचबरोबर सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील समभागांवरही दबाव निर्माण झाला.

आधीच खंगत चाललेल्या तुर्की अर्थव्यवस्थेवर अमेरिकेने दुप्पट आयात शुल्काचा घाला घातला आहे.

शुक्रवारी भांडवली बाजार व्यवहारानंतर जाहीर झालेल्या जूनमधील वाढत्या औद्योगिक उत्पादन दराकडेही गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष केले. विदेशी गुंतवणूकदार संस्थांचेही येथील भांडवली बाजारातील निधी निर्गमन कायम राहिले. कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांचे तसेच खनिज तेलाचे उतरत्या दराचेही बाजारात फारसे स्वागत झाले नाही.

३७,६९३.१९ या किमान स्तरावर नव्या सप्ताहाची सुरुवात करणारा सेन्सेक्स व्यवहारा दरम्यान ३७,५५९.२६ पर्यंत खाली आला होता. दिवसअखेर तो शुक्रवारच्या तुलनेत ०.५९ टक्क्य़ांनी घसरला. मुंबई निर्देशांकाने आधीच्या व्यवहारात १५५.१४ अंश नुकसान नोंदविले आहे.

बँकांमध्ये स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, येस बँक, बँक ऑफ बडोदा, फेडरल बँक, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक यांचे मूल्य सोमवारअखेर तब्बल ३.१७ टक्क्य़ांपर्यंत रोडावेल. तर सेन्सेक्समध्ये घसरणीत अव्वल वेदांताचा समभाग ३.४० टक्क्य़ांपर्यंत आपटला. त्याचबरोबर ओएनजीसी, पॉवर ग्रिड, एचडीएफसी लिमिटेड, रिलायन्स, एशियन पेंट्स, एनटीपीसी, टाटा स्टील, हिंदुस्थान यूनिलिव्हर, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, हीरो मोटोकॉर्प, अदानी पोर्ट्स, भारती एअरटेल यांचे मूल्यही दोन टक्क्य़ांपर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये तेल व वायू, सार्वजनिक उपक्रम, वित्त, ऊर्जा, बँक, पायाभूत, पोलाद, स्थावर मालमत्ता, वाहन, भांडवली वस्तू आदी घसरणीच्या यादीत राहिले. तर ग्राहकपयोगी वस्त, आरोग्यनिगा निर्देशांक वाढले. रुपयाच्या तुलनेतील भक्कम डॉलरमुळे माहिती तंत्रज्ञान निर्देशांकही उंचावला. या निर्देशांकात इन्फोसिस, विप्रो, टीसीएसचे मूल्य १.७५ टक्क्य़ापर्यंत वाढले. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये हेक्झावेर टेक्नॉलॉजिज् सर्वाधिक, २.६३ टक्क्य़ांनी वाढला. एकूण बीएसई आयटी निर्देशांक १.२४ टक्क्य़ांपर्यंत उंचावला.