एप्रिलमधील औद्योगिक उत्पादन निर्देशांक उणे स्थितीत
प्रामुख्याने निर्मिती क्षेत्रातील घसरणीमुळे देशातील एप्रिलमधील एकूण औद्योगिक उत्पादन (-)०.८ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. एप्रिल २०१५ मध्ये हे प्रमाण ३ टक्के होते. गेल्या तीन महिन्यांत औद्योगिक उत्पादन घसरते राहिले आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये दरातील वाढ २ टक्क्यांपर्यंत गेली होती.
चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्याच महिन्यात निर्मिती क्षेत्राचा प्रवास (-)३.१ टक्के राहिला आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत तो ३.९ टक्के होता. तर खनिकर्म तसेच ऊर्जानिर्मिती मात्र वर्षभरापूर्वीच्या उणे स्थितीतून काही प्रमाणात वाढली आहे.
आधीच्या, मार्च २०१६ मध्ये हा दर शून्याच्या किंचित वर ०.३ टक्के होता. तर वर्षभरापूर्वी, एप्रिल २०१५ मध्ये तो तब्बल ३ टक्के नोंदला गेला.
eco02
देशातील औद्योगिक उत्पादन ऑक्टोबर २०१५ मध्ये वर्षभरातील सर्वोच्च अशा ९.९ टक्क्यांवर विराजमान झाले होते, तर पुढील महिन्यातच ते (-)३.४ टक्के अशा वर्षांच्या तळात विसावले होते.
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी उशिरा जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, औद्योगिक उत्पादन निर्देशांकात ७५ टक्के हिस्सा राखणाऱ्या निर्मिती क्षेत्राचा प्रवास मोठय़ा प्रमाणात खुंटल्याने यंदा एकूण औद्योगिक उत्पादन दर उणे स्थितीत परिवर्तित झाल्याचे दिसून आले आहे. याचबरोबर भांडवली वस्तूनिर्मिती क्षेत्रातील घसरण २४.९ टक्क्यांची, ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील घट १.२ टक्क्यांची नोंदली गेली आहे. निर्मिती क्षेत्रातील २२ पैकी ९ उद्योगक्षेत्रांची कामगिरी यंदा नकारात्मक स्थितीत नोंदली गेली आहे.
बिगर ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रदेखील ९.७ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. विद्युत उपकरणनिर्मिती मात्र वर्षभरापूर्वीच्या १.३ टक्क्यावरून थेट ११.८ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. ऊर्जानिर्मितीतील वाढही सकारात्मक असून एप्रिल २०१६ मधील त्याची वाढ वर्षभरापूर्वीच्या ०.५ घसरणीतून तब्बल १४.६ टक्क्यांपर्यंत झेपावली आहे. खनिकर्म क्षेत्रानेही एप्रिल २०१५ मधील ०.६ टक्के घसरणीनंतर यंदाच्या एप्रिलमध्ये १.४ टक्के वाढ राखली आहे.