चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांची सुरुवात प्रथेप्रमाणे इन्फोसिसने शुक्रवारी दमदारपणे केली. सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील देशातील या दुसऱ्या क्रमांकाच्या कंपनीने अपेक्षा केली जात होती त्यापेक्षा सरस आर्थिक कामगिरी नोंदविली, पण दिवाळीच्या तोंडावर आपल्या भागधारकांना गेल्या वर्षांच्या तुलनेत अधिक म्हणजे ६०० टक्के (प्रति समभाग ३० रुपये) अंतरिम लाभांश तसेच एकास एक बक्षीस समभाग देणारी गोड घोषणाही केली.
इन्फोसिस टेक्नॉलॉजीज्ने जुलै ते सप्टेंबर २०१४ या दुसऱ्या तिमाहीत विक्रीत ४.५ टक्के वाढ करून ती १३,३४२ कोटींवर, तर याच कालावधीत निव्वळ नफ्यात ७.३ टक्के वाढ करून तो ३,०९६ कोटींवर नेला आहे. या तिमाहीत कंपनीची डॉलरमधील विक्री ३.२ टक्क्यांनी वाढून २,२०१ दशलक्ष डॉलर तर निव्वळ नफा ५११ दशलक्ष डॉलर इतका झाला. चालू आर्थिक वर्षांत रुपयातील महसूल ९ टक्के तर डॉलरमधील महसूल ७ टक्के दराने वाढण्याचे आधी दिलेले संकेत कंपनीने कायम ठेवले आहेत.
व्यवसायातील वाढ ही मुख्यत्वे जागतिक अर्थस्थितीत सुधारामुळे दिसून आल्याचे इन्फोसिसने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या तिमाहीत इन्फोसिसला मोठी कंत्राटे देणारे ग्राहक आपल्या व्यवसायाशी जोडण्यात यश आले. १०० दशलक्ष डॉलर गटात एक, ७५ दशलक्ष डॉलर गटात तीन तर २५ दशलक्ष डॉलर गटात पाच नवीन ग्राहक इन्फोसिसने सरलेल्या तिमाहीत जोडले आहेत.
इन्फोसिस व उपकंपन्या मिळून या तिमाहीत ४९ नवीन ग्राहक जोडण्यात इन्फोसिसला यश आल्याचे इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक विशाल सिक्का यांनी सांगितले. इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सिक्का हे पहिल्यांदाच या तिमाही निकालांच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. या तिमाहीत १४,२५५ नवीन कर्मचारी इन्फोसिसमध्ये दाखल झाले. सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ धोरणामुळे व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होत असल्याचे सिक्का यांनी सांगितले.
सिक्का हेच खणखणीत नेतृत्व : कामत
इन्फोसिसवर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड होऊन अवघे ७० दिवस लोटले आहेत. परंतु कंपनीने या तिमाहीत केलेल्या चमकदार कामगिरीचे श्रेय हे सर्वस्वी सिक्का यांनाच आहे, असे इन्फोसिसचे बिगर-कार्यकारी अध्यक्ष के. व्ही. कामत यांनी मत व्यक्त केले. सिक्का यांच्या मार्गदर्शनात इन्फोन्सिस उत्तरोत्तर नवीन शिखर सर करेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. गत ७० दिवसांमध्ये सिक्का यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, नवीन मालमत्ता, ग्राहक मिळविण्यात तसेच नवीन संघ उभारण्यात त्यांचे योगदान राहिले आहे. त्या आधीच्या वर्षभरात नारायण मूर्ती यांच्या कंपनीतील पुनरागमनाने कायापालटासाठी आवश्यक पाश्र्वभूमी तयार केली असल्याचे कामत यांनी आवर्जून सांगितले.
समभागाची ७ टक्क्यांनी मुसंडी
*भरघोस लाभांश व बक्षीस समभागाच्या घोषणेसह चमकदार तिमाही कामगिरीमुळे इन्फोसिसच्या समभागाला शुक्रवारी शेअर बाजारात मोठी मागणी दिसून आली. समभाग तब्बल ७ टक्क्यांनी उंचावून, ३,९०८ रुपये अशा वर्षांतील भावातील उच्चांक त्याने गाठला. बक्षीस समभाग वितरणाची तारीख (रेकॉर्ड डेट) कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही. पण तोवर बक्षीस समभागांच्या अपेक्षेने बाजारात समभागाची खरेदी आणि भावही वाढत जाणे अपेक्षित आहे.
भागधारकांना लाभच लाभ
*भागधारकांच्या हाती असलेल्या एका समभागावर कंपनीकडून आणखी एक समभाग बक्षीस (बोनस) म्हणून मिळणे म्हणजे भागधारकांसाठी लाभाची पर्वणीच ठरते. याचा अर्थ इन्फोसिसचे १०० समभाग असलेल्या भागधारकांकडे बोनस पश्चात २०० समभाग होतील. कंपनीकडून यंदा दिलेला प्रति समभाग ३० रुपये लाभांश पुढील वर्षीही दिला गेल्यास भागधारकांच्या समभागांची संख्या दुप्पट झाल्याने त्यांना लाभांशरूपी मिळणारी रक्कमही दुप्पट होईल. घसघशीत लाभांश वितरणानंतर इन्फोसिसच्या गंगाजळीत साडेपाच अब्ज डॉलर इतकी रोख शिल्लकराहील. कंपनीने अद्याप बोनससाठी पात्र भागधारक निश्चित करणारी तारीख (रेकॉर्ड डेट) जाहीर केलेली नाही.
संस्थापक सदस्यांना हृद्य निरोप
तिमाही निकालांना मंजुरी देण्यासाठी शुक्रवारी झालेल्या इन्फोसिसच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर उपाध्यक्ष क्रिश गोपालकृष्णन आणि पुनरागमनानंतर बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून एन. नारायण मूर्ती या मुदत संपुष्टात आलेल्या कंपनीवर कार्यरत शेवटच्या संस्थापक सदस्यांना निरोप देण्यासाठी के. दिनेश, नंदन नीलेकणी, एस. डी. शिबुलाल, एन. एस. राघवन हे अन्य निवृत्त संस्थापक सदस्य जातीने उपस्थित होते. अशोक अरोरा हे संस्थापक सदस्य भारताबाहेर असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत. नारायण मूर्ती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा कंपनीच्या भागभांडवलातील वाटा हा ‘प्रवर्तक’ गटात मोडत आला आहे, तसा उल्लेख यापुढे वगळला जावा, असा प्रस्ताव संचालक मंडळाच्या मंजुरीच्या कंपनीच्या विधी विभागाकडे पाठविण्यात येणार आहे, असे मूर्ती यांनीच सांगितले.
ऐंशीच्या दशकात इन्फोसिसच्या उभारणीत नारायण मूर्ती यांच्या साथीने संस्थापकाच्या भूमिकेत असलेले व सध्या इन्फोसिसमधून बाहेर पडलेले डावीकडून नंदन नीलेकेणी, के. दिनेश, क्रिश गोपालकृष्णन, नारायण मूर्ती, शिबूलाल व एन. एस. राघवन