विजेच्या बचतीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरलेल्या एलईडी दिव्यांना (बल्ब्स) आगामी काळात मागणी वाढत जाईल आणि दिव्यांच्या उद्योगातील देशातील ६० टक्के बाजारपेठ ते काबीज करतील, असे अंदाजले जात आहे.

देशात २०१३मध्ये प्रकाश उत्पादन क्षेत्रातील एकूण गुंतवणूक १३,००० कोटी रुपये होती, त्यापकी १९२५ कोटी रुपये केवळ एलईडी उत्पादनांवर गुंतविण्यात आले होते. आता भारतीय प्रकाश क्षेत्राने २०२० पर्यंत ३५,००० कोटींची उलाढाल करण्याचे लक्ष्य असून त्यापकी २१,६०० कोटी म्हणजे एकूण रकमेच्या ६०% हिस्सा एलईडी उत्पादनांवर गुंतविण्यात येत आहे, असे या उद्योगातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी सूर्या रोशनीचे व्यवस्थापकीय संचालक राजू बिस्ता यांनी भाकीत वर्तविले. एलईडीच्या धर्तीवर कंपनीने हाती घेतलेल्या ‘वीजबचत मोहिमे’च्या निमित्ताने त्यांनी हे विधान केले. देशात निर्माण होणारी वीज पुरेशी नाही, त्यातील १८ टक्के वीज ही प्रकाश उपकरणांसाठी वापरात येते. प्रकाशासाठी एलईडी दिव्यांचा अधिकाधिक वापर झाल्यास, २०२०पर्यंत वाढलेले वीज उत्पादन गृहीत धरूनही हे प्रमाण १८वरून १३ टक्क्य़ांवर आणले जाऊ शकेल, असे बिस्ता यांनी स्पष्ट केले. शासनाने रस्त्यांवरील दिवे तसेच सार्वजनिक ठिकाणच्या प्रकाशासाठी एलईडी दिव्यांच्या वापराला पाठिंबा मिळाल्याने या उत्पादनांनाही चांगला प्रतिसाद मिळेल, असे त्यांनी सांगितले.