उत्पादन खर्च वाढूनही क्षेत्रीय निर्देशांक एप्रिलमध्ये ५२.५ गुणांकावर

देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास सलग चौथ्या महिन्यात वाढता राहिला आहे. उत्पादन खर्चात वाढ होऊनही एप्रिलमधील निर्मिती निर्देशांक ५२.५ टक्के नोंदला गेला आहे.

निर्मिती क्षेत्राच्या प्रवासाचे मोजमाप करणारा निक्केई मार्किट इंडिया निर्मिती व्यवस्थापकांचा निर्देशांक ५० टक्क्यांच्या वर असता तर तो या क्षेत्राच्या प्रगतीचे लक्षण मानला जातो.

निर्मिती क्षेत्राला भेडसावणाऱ्या उत्पादन खर्चात सलग १९ व्या महिन्यात वाढ झाली आहे. असे असूनही एप्रिलमध्ये निर्मिती निर्देशांक ५० टक्क्यांपुढे राहिला आहे.

निर्मिती क्षेत्राची वाढ समाधानकारक मानली जात असली तरी वाढत्या महागाई दरामुळे रिझव्‍‌र्ह बँकेकडून उद्योग क्षेत्राला अधिक दिलासा मिळण्यासाठी आवश्यक व्याजदर कपातीची अटकळ कमी मानली जात आहे.

निर्मिती क्षेत्रातील उत्पादनांना असलेली मागणी ऑक्टोबर २०१६ नंतर पुन्हा वाढल्याचे यंदाच्या एप्रिलमधील क्षेत्राच्या कामगिरीवरून स्पष्ट होत आहे. तर एप्रिलमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात निर्यात वाढली आहे.

एप्रिलमधील निर्मिती क्षेत्राची वाढ ही नोव्हेंबर – डिसेंबर २०१६ मधील निश्चलनीकरणानंतरची पहिली वाढ आहे. यंदा उत्पादनांना निर्यातप्रधान देशांकडून तसेच स्थानिक पातळीवरही मागणी राहिल्याचे यंदाचा निर्देशांक स्पष्ट करतो.

निर्मिती क्षेत्राचा नव्या वित्त वर्षांच्या सुरुवातीचा प्रवास सकारात्मक मानला जात असला तरी उद्योगांना वाढत्या महागाईमुळे कंपन्यांच्या उत्पादन खर्चातील वाढीचा फटका बसला आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे उत्पादनांच्या किंमतीत बदल करण्यात आल्याचे निर्देशांकाकरिता करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ९३ टक्के सहभागींनी सांगितले.

६ एप्रिलच्या चालू वित्त वर्षांच्या पहिल्या द्विमासिक पतधोरणात रिझव्‍‌र्ह बँकेने मुख्य व्याजदर स्थिर ठेवले होते. तर एकूण वर्षांसाठी महागाई दर ४ ते ५ टक्के असेल, असे नमूद केले होते.

मुख्य क्षेत्राची मार्चमध्ये ५ टक्के वाढ

देशातील प्रमुख आठ क्षेत्रांची मार्च २०१७ मध्ये ५ टक्के वाढ झाली आहे. कोळसा तसेच स्टील उत्पादनाच्या जोरावर ही गेल्या तीन महिन्यातील सर्वोत्तम वाढ मानली जाते. प्रमुख आठ पायाभूत सेवा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, शुद्धीकरण उत्पादने, खते, स्टील, सिमेंट व ऊर्जा क्षेत्राची वाढ वर्षभरापूर्वी – मार्च २०१६ मध्ये ९.३ टक्के होती. यांमध्ये यंदा कोळसा व स्टील उत्पादन अनुक्रमे १० व ११ टक्के अधिक झाले आहे. तर ऊर्जा निर्मिती ५.९ टक्क्यांनी वाढली आहे. सिमेंट उत्पादनात मात्र यंदा ६.८ टक्के घसरण झाली आहे. तसेच शुद्धीकरण उत्पादनेही ०.३ टक्क्यांपर्यंत खाली आली आहेत. एकूण औद्योगिक उत्पादनात प्रमुख आठ क्षेत्रांचा हिस्सा ३८ टक्के आहे. २०१६-१७ या एकूण आर्थिक वर्षांत पायाभूत सेवा क्षेत्राची वाढ ४.५ टक्के राहिली आहे.