11 August 2020

News Flash

बाजार-साप्ताहिकी : थांबा व वाट पाहा!

या सप्ताहात बाजारात मुख्यत्त्वे औषध कंपन्या, ग्राहकोपयोगी वस्तू, बँका व वाहन कंपन्यांचे समभाग वधारले

संग्रहित छायाचित्र

* सुधीर जोशी

अमेरिका व युरोपियन देशांनी करोना संकटावर नियंत्रण मिळविल्याच्या तसेच चीनमधील उद्योग व्यवहार पूर्वपदावर येण्याच्या वृत्तामुळे जागतिक बाजारात तेजीची झुळूक आली व आपल्या बाजाराची गुरुवारच्या सत्राची सुरुवातही सकारात्मक झाली. विदेशी गुंतवणूकदारांकडून गेले काही आठवडे होणार विक्रीचा मारा थांबला व त्यांनी या आठवडय़ात ४,४०० कोटी रुपयांची खरेदी केली. दोन दिवसांच्या सुटीमुळे तीनच दिवस व्यवहार झालेल्या या सप्ताहात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात (सेन्सेक्स) ३,५६९ अंकाची तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात (निफ्टी) १,०२८ अंकांची झालेली साप्ताहिक वाढ गेल्या दोन महिन्यात होरपळलेल्या गुंतवणूकदारांना दिलासा देणारी ठरली.

या सप्ताहात बाजारात मुख्यत्त्वे औषध कंपन्या, ग्राहकोपयोगी वस्तू, बँका व वाहन कंपन्यांचे समभाग वधारले. औषध कंपन्यांचे समभाग गेली अनेक वर्षे मंदीच्या छायेत होते. कधी कंपनीच्या सुशासनावरील आक्षेप तर कधी अमेरिकन औषध संचालयनाच्या (एफडीए) निर्बंधांमुळे औषध कंपन्यांमधील गुंतवणूक सर्वांच्या भागभांडारामधील ओझे बनली होती. २०१४ मध्ये १० लाख कोटींवर असणारे बाजारमुल्य निम्मे झाले होते. या महिन्यांतील २० टक्क्य़ांच्या वाढीमुळे या क्षेत्रामध्ये परत आशेचे किरण दिसू लागले आहेत.

वाहन क्षेत्रदेखील मंदीमधून बाहेर येण्याच्या आतच करोनाग्रस्त झाले होते. परंतु या सप्ताहाच्या शेवटी रसातळात गेलेल्या बाजार मुल्याचा फायदा घेण्यासाठी त्यामध्ये खरेदी होऊन वाहन उद्योगाच्या क्षेत्रीय निर्देशांकात १० टक्यांची वाढ झाली.

येस बँकेवरील निर्बंधांमुळे एकूणच खासगी बँकांमधील ठेवींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. करोना संकटामुळे झालेल्या बाजाराच्या घसरणीचा परिणाम बँकांवर फार मोठा झाला होता. त्यामुळे बाजार सुधारताच पहिल्याच दिवशी बँक निर्देशांकात २००९ नंतरची सर्वात मोठी एकदिवसीय वाढ (१०.५० टक्के) पाहायला मिळाली.

मागील लेखात म्हटल्याप्रमाणे, ग्राहकोपयोगी वस्तुंची विक्री करणाऱ्या कंपन्यांनी या सप्ताहात उसळी घेतली ज्यामध्ये हिंदुस्तान यूनिलिव्हरचे समभाग अग्रभागी होते. कंपनीचे बाजारमुल्य-नफ्याचे गुणोत्तर (पीई रेशो) ८० च्या वर गेले तरी या समभागांना मागणी आहे. लॉकडाऊनच्या काळातही व्यवसायावर जास्त परिणाम न झालेली एक कंपनी म्हणजे अ‍ॅव्हेन्यु सुपर मार्ट.

घरपोच सामान पोहोचविण्याची कल्पना अंमलात आणून कंपनीने संकट काळात तग धरण्याची शाश्वती दाखविली आहे. पीई रेशो १५० ला पोहोचला असताना देखील समभागांची मागणी कायम आहे. अशा समभागात गुंतवणूक करण्यासाठी योग्य संधीची वाट पाहावी.

बाजाराचे लक्ष सध्या करोना संकटातून कशी मुक्तता होणार व पुढील सप्ताहात टाळेबंदी (लॉकडाऊन) संपणार का याकडे आहे. ते लवकर संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे भांडवली बाजार तूर्त तरी थांबा व वाट पाहा याच अवस्थेमध्ये राहील.

टाळेबंदी संपूर्णपणे नाहीशी झाली तरी जीवन सुरळीत होण्यास काही काळ लागेलच. त्यामुळे लघू उद्योगांवरील मंदीचे सावट पुढील सहा महिन्यांपर्यंत कायम राहील. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सध्या आलेल्या तेजीमध्ये थोडी नफाकमाई करून नवीन गुंतवणुकीच्या संधीची वाट पाहावी, हेच उत्तम!

sudhirjoshi23@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 12:17 am

Web Title: market weekly article on wait and wait abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 बँक ऑफ महाराष्ट्रच्या आपत्कालीन पतपुरवठा योजना
2 महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्यांच्या फेरआढाव्याचे रिझव्‍‌र्ह बँकेचे आदेश
3 Coronavirus : संकटकाळात भविष्यनिधीची मदत; EPFO कडून २८० कोटी रूपयांचे क्लेम सेटल
Just Now!
X