दूरसंचार क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणारी बहुप्रतीक्षित दिशानिर्देश अखेर गुरुवारी उशिरा जाहीर झाले. ताबा आणि विलीनीकरण प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कंपन्यांवरील तीन वर्षांच्या आतील समभाग विक्रीचे र्निबध काढून टाकतानाच अशा कंपन्यांना मात्र ५० टक्क्यांपेक्षा अधिक हिस्सा विलीन करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या दिशानिर्देशांचे संकेत खुद्द दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल खुल्लर यांनी दिले होते आणि लगोलग देशातील १२ दूरसंचार कंपन्यांच्या आगामी गुंतवणूक व्यूहरचना सुलभ करणारे दिशानिर्देश जारी केले. या निर्देशांनंतर या क्षेत्रात निवडक चार ते सहा खेळाडू राहण्याची शक्यता आहे. भारती एअरटेलचा लूप मोबाइलवर ताब्याचा मनोदय असला तरी एअरसेल आणि टाटा टेलिसव्र्हिसेसला नव्या घरोब्यासाठी या तत्त्वांची प्रतीक्षा होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2014 1:07 am