आविष्कार देशमुख

करोना काळातील टाळेबंदीने आर्थिक फटका बसलेल्या उद्योगक्षेत्राच्या अडचणी दिवसागणिक वाढतच आहेत. आधीच बाजारपेठांमध्ये मागणी कमी असताना आता उद्योगधंद्यांना लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीही १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका राज्यभरातील लघु उद्योजकांना बसत आहे.

मार्च महिन्यात लागलेल्या टाळेबंदीमुळे तब्बल तीन महिने सर्वच उद्योग बंद होते. त्यानंतर टाळेबंदी शिथिल झाली. परंतु सरकारने जाहीर केलेल्या करोना मार्गदर्शक तत्त्वांमुळे उद्योग सुरू करताना अनेक अडचणी आल्या.

बाजारातून मागणी कमी असल्याने उत्पन्नात घट झाली. अशा सर्व संकटांचा सामना उद्योजक करीत असतानाच गेल्या महिनाभरापासून कच्च्या मालाच्या किंमतीत १५ ते २० टक्केवाढ झाली आहे.

पूर्व नोंदणी केलेल्या उत्पादनाची पूर्तता करताना नवीन दरातील कच्चा माल खरेदी करताना उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या स्टील, लोखंड, कॉपर, मँगनीज, ब्रांझ, अ‍ॅल्युमिनियम आदी धातू, रसायन, चांदी तसेच क्राफ्ट बॉक्सच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे उत्पादन क्षमता कमी असलेले उद्योग प्रभावित होत आहेत.

उद्या नागपुरात बैठक

कच्च्या मालात २० टक्क्यांची वाढ उद्योगांना परवडणारी नाही. केंद्र आणि राज्य सरकारचे या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी १६ डिसेंबर रोजी उद्योजक संघटनांची एक बैठक नागपुरात आयोजित करण्यात आली आहे.

कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीचा फटका लघु व मध्यम उद्योगाला बसत आहे. उद्योजक संघटनांची बुधवारी बैठक आहे आणि त्यात होणारा निर्णय घेऊन केंद्र आणि राज्य सरकारला कळवणार आहोत.

– सी.जी. शेगोकर, अध्यक्ष, मॅन्युफॅक्चर्स इंडस्ट्रीज असोसिएशन, नागपूर.

कच्च्या मालाच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढीचे कारण अस्पष्ट आहे. मागणी घसरली असताना उत्पादन खर्च वाढणे हे उद्योगांवर संकटाचेच ठरेल.  केंद्र व राज्य सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

– नितीन लोणकर, माजी अध्यक्ष, बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशन