‘मायक्रोसॉफ्ट’ ने मुंबई, पुणे आणि चेन्नई या भारतातील तीन डेटासेंटरकडून ‘अझूर’ या सुरक्षित आणि विश्वासपात्र सार्वजनिक क्लाऊड प्रदात्या सेवांची घोषणा केली असून जगभरातील व्यावसायिक आणि संस्थांना त्याचा लाभ घेता येणार आहे. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या राज्य सरकारच्या अनेक सेवा मायक्रोसॉफटच्या या क्लाऊड तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक ऑक्टोबरपासून उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सेवांची सुरुवात करताना जाहीर केले.
या क्लाऊड सेवांचा उपयोग शिक्षण, आरोग्य यासह अनेक बाबींसाठी राज्याला करता येईल. तंत्रज्ञानामुळे आर्थिक प्रगतीला हातभार लागेल आणि उत्पादकताही वाढेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्याच्या एकात्मिक प्रगतीच्या दृष्टीने, तसेच गतिमान व पारदर्शी कारभारासाठी या तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
भारतात मायक्रोसॉफ्ट क्लाऊडमुळे देशात पुरेशी संगणकीय शक्ती प्राप्त होण्याबरोबरच, संगणक प्रक्रियेची पद्धत बदलणार आहे. हा हायपर स्केल क्लाऊड सरकार, उद्योग, वित्तीय संस्था आदींना उपयुक्त ठरेल, असा विश्वास मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष भास्कर प्रामाणिक यांनी व्यक्त केला.
सुरक्षितता, खासगीपणा, नियंत्रण, पूर्तता आणि पारदर्शकता या मूलभूत तत्वांवर या क्लाऊडची सेवा उच्चतम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अझूर सेवांबरोबरच डायनॅमिक्स सीआरएम ऑनलाईन सेवा २०१६ मध्ये सुरु केल्या जाणार आहेत. सरकारी विभाग आणि राज्याच्या मालकीचे उद्योग सार्वजनिक क्लाऊड सेवांचा वापर करु शकणार आहेत.