ब्रिटनमधील पोलाद उद्योगाला भेडसावत असलेल्या समस्या आणि परिणामी या व्यवसायाच्या विक्रीच्या अपरिहार्यपणे घ्याव्या लागलेल्या निर्णयाचा, टाटा समूहाच्या जागतिक विस्ताराच्या रणनीतीवर कोणताही परिणाम संभवत नाही आणि निरंतरपणे आंतरराष्ट्रीय परीघ विस्तारत नेण्याचे समूहाचे धोरण कायम असल्याची ग्वाही बुधवारी येथे देण्यात आली.

तब्बल ११० अब्ज अमेरिकी डॉलर उलाढाल असलेल्या टाटा समूहाचा ७० टक्के महसूल हा आंतरराष्ट्रीय व्यवसायातून येतो. गेल्या दशकात योजनापूर्वक राबविलेल्या जागतिक विस्ताराच्या मोहिमेतून, पोलाद व्यवसायात कोरस स्टील आणि वाहन क्षेत्रात जॅग्वार लॅण्ड रोव्हर या ब्रिटनमधील प्रतिष्ठित नाममुद्रांवर टाटांची मोहोर उमटली. ब्रिटनमध्ये केल्या गेलेल्या दोन मोठय़ा अधिग्रहणांचा समूहाचा आंतरराष्ट्रीय महसुलातील योगदान लक्षणीय आहे.

आजही आपण एक भारतीय कंपनी म्हणून गणली जाण्याऐवजी खऱ्या अर्थने जागतिक उद्योगसमूह म्हणून गणले जात आहोत, अशी स्पष्टोक्ती टाटा सन्स ब्रॅण्डचे काळजीवाहक आणि समूहाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य मुकुंद राजन यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

‘अलीकडे काही मंडळींचा पक्का ग्रह झाला आहे की, टाटांनी आपल्या जागतिक व्यवसाय धोरणाला मुरड घातली आहे. हे संपूर्णपणे असत्य असून, आजही समूहाचा ७० टक्के महसूल हा आंतरराष्ट्रीय व्यवसायांतूनच येत आहे,’ असे राजन म्हणाले.

समूहातील काही कंपन्यांबाबत आज सुरू असलेल्या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, विदेशात पंख पसरण्याऐवजी टाटांनी पुन्हा भारतात व्यवसायाच्या सुदृढीकरणावर भर दिला जाईल, असा आपल्याबद्दल एक दृष्टिकोन बनविला गेला असल्याचे आढळून येत असल्याकडे मुकुंद राजन यांनी निर्देश केला. हा अत्यंत चुकीचा ग्रह आहे. तो खोडून काढताना त्यांनी टीसीएसचे उदाहरण पुढे केले आणि जॅग्वार लॅण्ड रोव्हरचे संपादनही अतिशय यशस्वी ठरले असल्याचे सांगितले.

टाटा समूहाचा जागतिकीकरणाचा प्रवास हा अनेकांच्या डोळ्यात अंजन ठरला आहे. अमेरिका, युरोप, चीन अशा जगातील सर्वोत्तम गणल्या गेलेल्या बाजारपेठांमध्ये आम्ही आमच्या क्षमता व मत्तेचा ठसा उमटविण्यात पुरेपूर यशस्वी ठरल्याचे हा प्रवास दर्शवितो. भारतातील कंपन्यांना असे जागतिक यश मिळू शकते हा विश्वास अनेकांचे डोळे उघडणाराच आहे,