कुटुंबाच्या विशेषत: कुटुंबातील कर्त्यां व्यक्तीच्या अकस्मात जाण्याने ओढवणाऱ्या आर्थिक संकटावर विम्यांशिवाय दुसरा पर्याय आज तरी दिसत नाही. विशेषत: निम्न उत्पन्न गटातील, हातावर पोट असलेल्या कष्टकरी वर्गासाठी विशेषरीत्या प्रस्तुत केल्या गेलेल्या ‘सूक्ष्म विमा योजना’ अस्तित्वात आल्या असल्या, तरी त्या त्यांच्यापर्यंत कितपत पोहोचल्या, या गरजवंतांना या योजनांबाबत किती माहिती आहे या संबंधाने मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. डॉली सन्नी आणि संशोधिका सई कुलकर्णी यांनी मुंबईत एक विस्तृत प्रश्नावलीद्वारे पाहणी केली. या पाहणीचे अनेक निष्कर्ष हे अनपेक्षित आणि आश्चर्यकारक नसले तरी माहितीचा अभाव, अनभिज्ञता या बाबी मुंबईसारख्या बडय़ा शहरातही आजही मोठा अडसर ठरत असल्याचे आढळून आले.

मुंबई महानगर हे ‘कधीही न झोपणारं शहर’ म्हणून ओळखलं जातं. पण, या शहरांतील असंघटित गटांत केलेल्या एका प्राथमिक पाहणीनुसार, या शहराला सूक्ष्म विम्याच्या अस्तित्वाबद्दल अजूनही जाग यायची आहे असेच म्हणावे लागेल. अलीकडेच ‘विम्याची माहिती असणे’ हा मुख्य निकष ठरवत केल्या गेलेल्या पाहणीत, मुंबई महानगरपालिकेच्या एफ-उत्तर व एफ-दक्षिण विभागांतील ३४४ कष्टकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या असता, त्यापैकी फक्त १२२ जणांनीच, म्हणजे ३५.४७ टक्के लोकांनी होकारार्थी प्रतिसाद दिला.
होकारार्थी उत्तर आलेल्या या १२२ प्रश्नावलींचे विश्लेषण, विमासेवेचा ग्राहक होण्याची प्रेरणा प्रस्थापित करून त्या अनुषंगाने विमा सेवेचा प्रसार कसा वाढवता येईल हे ठरवण्यासाठी केले गेले. त्यासाठी या उत्तरकर्त्यांची विमासेवा घेण्यापाठीमागची प्रेरणा, विमा पुरवठादाराबद्दलच्या पूर्व माहितीमुळे आहे की विमा सेवेबद्दलच्या माहितीमुळे (याचा स्रोत, परिसर अथवा प्रसार माध्यम अथवा काहीही असू शकेल.) आहे की विमा सल्लागाराने वर्तमान सभासदांना देऊ केलेल्या सेवेमुळे आहे, या तीन विभागांत समजावून घेतली. या विश्लेषणांत असे दिसून आले की, आपल्या समाजात, विमा सल्लागाराच्या पूर्वेतिहासाइतकेच वर्तमान सभासदांच्या अनुभवाला महत्त्व आहे. एखाद्या विमा सल्लागाराच्या चांगल्या व्यवहार-वर्तनामुळे त्याच्या व्यवसायात वृद्धी होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे या पाहणीतून सिद्ध होते. विमासेवेच्या निवडीबाबत आपल्या परिसराचा (ज्याचा परीघ नातेवाईक, शेजारी-पाजारी व मित्रमंडळींना ओलांडून कामाचे ठिकाण व तेथील वातावरणालाही समाविष्ट करतो) प्रभावही या पाहणीत प्रामुख्याने पुढे आला आहे. आजकालच्या जगण्याचा अविभाज्य घटक म्हणजे, प्रसार माध्यमं! ती ही या प्रसारात आपले योगदान देत असून सरकारी व गरसरकारी स्वयंसेवी संस्थांचा सूक्ष्म विम्याच्या प्रसारात सहभागही वाखाणण्याजोगा आहे हे या पाहणीतून समोर येते. त्यांच्या प्रेरणेमुळे विमासेवेकडे आकर्षति झालेला ग्राहक काळजीपूर्वक केलेल्या योजना निवडीपासून निर्णयांपर्यंतच्या प्रक्रियेपर्यंत केल्या गेलेल्या शंका निरसनाने संतुष्ट असतो, हेही पाहणीतून दिसून येते. सरकारी विमा कंपनीच्या सल्लागारांनी ग्राहकांना आकर्षति करण्याच्या पातळीवर अत्युत्तम कामगिरी करत खासगी कंपन्यांच्या विमा सल्लागारांना बरेच मागे टाकल्याचेही हे विश्लेषण सप्रमाण दर्शवते. विमाविषयक प्रेरणेबाबत प्रसार माध्यमांइतका प्रभावशाली स्रोत दुसरा नाही या निष्कर्षांपर्यंत हे विश्लेषण आपणांस घेऊन जाते.
विमायोजनेचा सभासद अथवा ग्राहक बनण्यासाठी आíथक स्थितीसोबतच वैवाहिक दर्जाही महत्त्वाचा ठरतो. माफक उत्पन्न असलेल्या माणसाला लग्नासोबत वाढलेल्या जबाबदारीची जाणीव विमा योजनेकडे अधिक प्रमाणात आकर्षति करते हा अनुभव आहे. या ‘शक्यतां’चे व्यवसायांत रूपांतर करण्यासाठी समाजात आíथक साक्षरता आणावी लागेल. आíथक साक्षरतेमुळे, समाजमनातील अनेक शंकाकुशंकांना शब्दरूप मिळेल. या शंकांचे निरसन होता होता समाजाच्या गरजांना निश्चित असा आकार प्राप्त होईल आणि त्याला टाळणं संबंधित अधिकाऱ्यांना अशक्य होऊन बसेल. या पाहणीच्या आधारे आम्ही या निष्कर्षांप्रत आलो आहोत की, समाजातील प्रत्येक व्यक्तीची सुरक्षितता व त्याची अपेक्षापूर्ती हे अंतिम ध्येय गाठण्यासाठी, सरकारी क्षेत्रांतील विमाकारांच्या प्रतिमेचा उपयोग करून सरकारी व बिनसरकारी विमाकार आणि प्रसार माध्यमांनी एकत्र येऊन सूक्ष्म-विम्याचा प्रसार करत समाजमनावर आíथक साक्षरता ठसवावी लागेल.

असंघटितांना सुरक्षा कवच ‘सूक्ष्म विमा’ काय आहे?
विमा कंपन्यांनी समाजांतील वेगवेगळ्या स्तरांतील अपेक्षांचा विचार करून त्यांच्या पूर्ततेसाठी अनेक प्रकारच्या योजना सोप्या, सहज समजू शकेल अशा भाषेतील नियमावलीसह बाजारांत आणल्या आहेत. या कंपन्यांनी, कष्टकरी असंघटित किंवा मुख्य प्रवाहांपासून वंचित राहिलेल्या गटांना विमा संरक्षणाच्या छत्राखाली घेण्यासाठी त्यांना परवडेल अशा सूक्ष्म हप्त्यात पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या पर्यायालाच ‘सूक्ष्म विमा’ किंवा ‘मायक्रो इन्श्युरन्स’ म्हणतात.