बीजिंग येथे मुख्यालय असणाऱ्या एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने (एआयआयबी) मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी) ५० कोटी अमेरिकी डॉलर अर्थात सुमारे ३,६०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. मुख्यत: यातून विरार-डहाणू उपनगरी रेल्वेचे चौपदरीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे.

भारत सरकारला देण्यात येणाऱ्या या ३,६०० कोटींच्या कर्जामुळे मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या जाळ्यातील अपूर्ण कामांना गती मिळण्याची, दररोज प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासाच्या दृष्टीने सुधारणा होणे अपेक्षित आहे. हा निधी मुंबईला आजूबाजूच्या परिसरांशी जोडण्याच्या हेतूने उपनगरी रेल्वे सेवेचा विस्तार करण्यासाठी विरार-डहाणू रोड मार्गिकेच्या (६४ किलोमीटर) चौपदरीकरणासाठी योगदान दिले जाणार आहे. झपाटय़ाने नागरीकरण होत असल्याने व लोकसंख्या वाढत असलेल्या पनवेल व कर्जत दरम्यान नवीन उपनगरी रेल्वे मार्गिकाही (२८ किलोमीटर) बांधली जाणार आहे.

गेल्या चार वर्षांमध्ये, एआयआयबीची भारतातील गुंतवणूक लक्षणीय वाढली आहे, असे एआयआयबीचे उपाध्यक्ष व मुख्य गुंतवणूक अधिकारी डी. जे. पांडियन यांनी सांगितले. बँक भारताच्या विकासासाठी पािठबा देत असल्याने, एआयआयबी यापुढे सरकारच्या प्राधान्यक्रमानुसार आपली धोरणे आखणार आहे, असे त्यांनी सांगितले. बँकेने देशात केलेला एकूण अर्थपुरवठा आता २.९ अब्ज डॉलरच्या घरात गेला आहे.

एआयआयबीच्या संचालक मंडळाने ऑक्टोबरमध्ये एकूण ५७.५ कोटी डॉलरच्या वित्तपुरवठय़ाला मंजुरी दिलेले दोन प्रकल्पांमधून, देशाच्या आíथक राजधानीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि अपारंपरिक ऊर्जा, विजेचे पारेषण आणि पेयजल पायाभूत सुविधांमधील खासगी भांडवल गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. बँकेने ऑक्टोबरमध्ये टाटा क्लीनटेक कॅपिटल लिमिटेड (टीएलएलसी) या अपारंपरिक ऊर्जानिर्मितीसाठी अर्थसाहाय्य करणाऱ्या भारतातील आघाडीच्या कंपनीला ७.५ कोटी डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे.