म्युच्युअल फंडांबाबत ‘अ‍ॅम्फी’चा आगामी दशकासाठी भविष्यवेध

भारतीय म्युच्युअल फंड उद्योगात आगामी दशकभरात सध्याच्या तुलनेत मालमत्ता चार पटीने वाढून १०० लाख कोटींवर तर गुंतवणूकदारांची संख्या पाच पटीने वाढून १० कोटींवर जाईल, असा आशावादी संकेत या उद्योगाचे प्रतिनिधित्व करणारी संघटना ‘अ‍ॅम्फी’ने दिला आहे. मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘अ‍ॅम्फी-बीसीजी व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये बडय़ा महानगरांबाहेर देशाची ९० टक्के लोकसंख्येचा निवास असणाऱ्या प्रमुख ३० शहरांमध्ये म्युच्युअल फंडांकडून चांगला जम बसविला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

बँका, टपाल कार्यालये अशा नव्या वितरण वाहिन्यांमार्फत म्युच्युअल फंडांचे वितरण सर्वदूर करताना, आणखी ४ लाख वितरकांची दशकभरात भर घातली जाईल. परिणामी देशातील १०० शहरांमध्ये अस्तित्व विस्तारले जाऊन, गुंतवणूकदारांमध्येही सध्याच्या २ कोटींमध्ये आणखी ८ कोटींची भर घातली जाईल, असे ‘अ‍ॅम्फी’चे अध्यक्ष निमेश शहा यांनी स्पष्ट केले.

लोकांचा कल हा वित्तीय गुंतवणुकांकडे वाढत असल्याचे पाहणे उत्साहदायी असल्याचे अ‍ॅम्फीचे मुख्य कार्यकारी एन. एस. वेंकटेश यांनी नमूद केले. ‘म्युच्युअल फंड सही है’ जाहिरात मोहिमेने महागाई वाढीच्या दराला मात देऊ शकेल अशा समभाग व म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबाबत लोकांमध्ये जागरूकतेच्या दृष्टीने मोलाची कामगिरी केली आहे, असे त्यांनी सांगितले.

या निमित्ताने ‘अ‍ॅम्फी-क्रिसिल फॅक्ट बुक’चेही अनावरण करण्यात आले. एप्रिल २०१६ पासून ते जुलै २०१९ पर्यंत म्युच्युअल फंड गंगाजळीत १० लाख कोटींची नवीन भर पडली आहे, तर त्यातील २३ टक्के हे नियोजनबद्ध गुंतवणूक पद्धत अर्थात ‘एसआयपी’मार्फत आली आहे. एसआयपी खात्यांची संख्या १ कोटींवरून २.७३ कोटींवर गेली आहे. व्यक्तिगत गुंतवणूकदारांचे वार्षिक एसआयपी योगदान हे २०१६-१७ मधील ४४,००० कोटींवरून २०१८-१९ मध्ये ९३,००० कोटी रुपयांवर गेले आहे. चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल-जून २०१९ या पहिल्या तिमाहीत व्यक्तिगत गुंतवणूकदारांचा एसआयपीमार्फत आलेला ओघ २५,००० कोटींचा आहे.

महाराष्ट्राचा वरचष्मा कायम

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने म्युच्युअल फंड मालमत्तेत महाराष्ट्राचा स्वाभाविक वरचष्मा राहिला आहे. मार्च २०१४ मध्ये एकूण मालमत्तेत जवळपास निम्मा म्हणजे ४७ टक्के वाटा एकटय़ा महाराष्ट्राचा होता, तो जून २०१९ अखेर ४२ टक्के असा कायम आहे. या आघाडीवरील अन्य चार राज्ये म्हणजे नवी दिल्ली (८ टक्के), कर्नाटक (७ टक्के), गुजरात (५ टक्के), पश्चिम बंगाल (५ टक्के) महाराष्ट्राच्या तुलनेत खूप मागे असल्याचे ‘अ‍ॅम्फी’ची आकडेवारी दर्शविते. मागील पाच वर्षांत अव्वल पाच राज्यांमध्ये म्यु्च्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वार्षिक सरासरी २१.५ टक्क्यांनी वाढला, त्याउलट उर्वरित राज्यांमध्ये गुंतवणूक ओघात वाढीचा वेग अधिक गतिमान म्हणजे २४.४ टक्के असा आहे. सर्वाधिक ३० टक्के गुंतवणूक समभागसंलग्न फंडांमध्ये राखून गुजरातने सर्वावर सरशी साधली आहे.