मुंबईतील आतंरराष्ट्रीय विमानतळ विकसित करणाऱ्या जीव्हीके समूहाच्या मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळ लि. (एमआयएएल) या कंपनीचा ७४ टक्के वाटा अधिग्रहित करण्याचे समीकरण अदानी समूहाने जुळवले असून त्यामुळे मुंबई विमानतळाबरोबरच नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पही अदानी समूहाच्या ताब्यात गेला आहे. या आधी दोन वर्षांपूर्वी मुंबई उपनगरातील वीजवितरण व्यवसायावर अदानी समूहाने ताबा मिळवला होता.
जीव्हीके समूहाच्या विमानतळ विकास व्यवसायाशी संबंधित कंपनीचा मुंबई विमानतळ विकसित करणाऱ्या ‘एमआयएएल’ या कंपनीत ५०.५० टक्के वाटा आहे. प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने जीव्हीके समूहातील विमानतळ व्यवसाय कं पनीवरील वित्तीयसंस्थांचे कर्ज आपल्याकडे घेतले असून त्याचे रूपांतर भागभांडवलात केल्याने या कंपनीवर अदानीचा ताबा येणार आहे. तसेच इतर तीनपैकी एसीएसए आणि बिडवेस्ट या दोन कंपन्यांकडील २३.५ टक्के वाटाही अदानी घेणार आहे. त्यामुळे ‘एमआयएएल’मधील अदानीचा वाटा ७४ टक्के होईल तर भारतीय विमानतळ प्राधिकरणाचा वाटा २४ टक्के असेल. अदानी समूहाबरोबरील या व्यवहाराची माहिती जीव्हीके समूहाने मुंबई शेअर बाजाराला कळवत त्याबाबत निवदेन प्रसिद्ध केले आहे. नवी मुंबई विमानतळाचे कामही याच ‘एमआयएएल’कडे असल्याने आता नवी मुंबईतील प्रकल्पही अदानीच्या ताब्यात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करण्यात ‘जीव्हीके’समूह असमर्थ ठरत असल्याच्या कारणावरून जूनमध्ये सिडकोने नोटिस बजावली होती. ‘हे काम करण्याची तुमची आर्थिक क्षमता आहे का’, असा जाब सिडकोने ‘जीव्हीके’ कंपनीला विचारच एक—दोन महिन्यांत काम मार्गी न लागल्यास पुढील निर्णय घेण्याची तयारी केली होती. त्यामुळे नवी मुंबई प्रकल्पातून जीव्हीकेला बाहेर पडावे लागणार असे स्पष्ट झाले होते. आता अदानी समूहाच्या या व्यवहारामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानीच्या ताब्यात जाणार हे स्पष्ट झाले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 1, 2020 12:13 am