नवनवे मित्र आणि मित्र परिवाराचे वर्तुळ निरंतर वाढते ठेवणारे लोकप्रिय जनमाध्यम म्हणून ‘फेसबुक’चे तरुणाईमधील आकर्षण वादातीत आहे. पण एका ठरावीक मर्यादेनंतर स्नेहिजनांमध्ये शेअर करण्यासारखे काही उरत नसल्याने याच फेसबुकचा पुढे जाऊन कंटाळा येत असल्याची उदाहरणेही आहेत. पण तुमची व मित्रांची आवड-निवड, पसंती कल जोखून त्यांना पचेल आणि रुचेल असे निरंतर नवनवीन कंटेन्ट तुम्हाला उपलब्ध करून देत, फेसबुकवरील तुमची लोकप्रियता वाढविणारा ‘रेकमंडली’ हा सायबर जगतात नवा सोबती बनून पुढे आला आहे.
फेसबुक, ट्विटर, गुगल प्लस आदी सध्या उपलब्ध लोकप्रिय जनमाध्यमांबाबत प्रारंभीच्या काळातील उत्सुकता उत्तरोत्तर घटत जाऊन त्याचे पुढे जाऊन कंटाळ्यात रूपांतर होते. नव्याने पोस्ट करण्याइतका एक तर वकूब नसणे अथवा इतरांमध्ये शेअर करण्यासारखे काही शिल्लक न राहणे हेच या जनमाध्यमांकडे लोकांनी पाठ फिरविण्याचे अथवा युजर्सच्या निष्क्रियतेचे बहुतांश कारण असल्याचे दिसून आले आहे, असे ‘रेकमंडली’चे प्रवर्तक आणि मुख्याधिकारी वेंकट रमणा यांनी सांगितले. अमेरिकेत स्थापित या डिजिटल मार्केटिंग कंपनीने अलीकडेच मुंबईत आपले कार्यालय कार्यान्वित केले असून, वेकंट या कार्यालयाचे प्रभारी आहेत. सध्या त्यांनीच विकसित केलेल्या Recommendly.ly या वेबस्थळाने जनमाध्यमांचा वीट आलेल्या जगभरातील लक्षावधी मंडळींमध्ये पुन्हा उत्साह जागविण्याचा जणू विडाच उचलला आहे. युजरचा पसंती आलेख आणि त्याचे सामाजिक वर्तुळ याला जोखून समर्पक आणि लक्षवेधी मजकुराचे विस्तीर्ण दालन या वेबस्थळाने विनामोबदला खुले करून दिले आहे. रेकमंडलीचा वापर पूर्णपणे सुरक्षित आणि युजरची गोपनीयता शाबूत ठेवणारा असल्याचे स्पष्ट करताना, यावरील पोस्ट्सचा वापर करून कोणाही युजरला अधिकाधिक लाइक्स आणि कॉमेन्ट्स मिळवून निश्चितच     लोकप्रियता मिळविता येईल, असा वेंकट यांचा दावा आहे.
सध्या फेसबुक या जनमाध्यमापुरते सीमित असलेल्या ‘रेकमंडली’च्या कंटेन्ट पोस्ट वा शेअर करण्याच्या सेवा पुढे जाऊन, ट्विटर आणि गुगल प्लस मंचावरील लोकांसाठीही खुल्या होतील, असे वेंकट यांनी सांगितले. सध्या जगभरातील १२० देशांत ३६००० फेसबुक युजर्स रेकमंडलीचा वापर करीत आहेत. सायबर विश्वातील प्रभावशीलतेचे मापन करणाऱ्या ‘क्लाऊट’द्वारे या मंडळींचा ‘क्लाऊट स्कोअर’ अर्थात प्रभाव केवळ महिनाभरात २५ टक्क्यांनी वधारल्याचे आढळून आले आहे, अशी पुस्तीही वेंकट यांनी आपल्या दाव्याच्या पृष्टय़र्थ जोडली आहे.

जगभरातील १२० देशांत ३६००० फेसबुक युजर्स सध्या रेकमंडलीचा वापर करीत आहेत. सायबर विश्वात या मंडळीची प्रभावशीलता केवळ महिनाभरात २५ टक्क्यांनी वधारल्याचे आढळून आले आहे.
’ वेंकट रमणा
संस्थापक ‘रेकमंडली’