बिलावर ‘एफएसएसएआय परवाना क्रमांक’ अनिवार्य

नवी दिल्ली : उपाहारगृह तसेच खान-पान व्यवसाय चालविणाऱ्या प्रत्येकाने येत्या १ ऑक्टोबरपासून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बीजक अथवा बिलांवर १४ अंकांचा ‘एफएसएसएआय परवाना क्रमांक’ नमूद करणे बंधनकारक करणारा नवीन आदेश अन्न सुरक्षा नियामक असलेल्या ‘एफएसएसएआय’ने गुरुवारी काढला.

विशिष्ट खाद्य व्यवसायाबाबत कोणतीही तक्रार असल्यास ग्राहकांना अचूक तपशील सादर करता यावा तसेच त्यांच्या समस्येचे निराकरण करण्याच्या दृष्टीने हा नवीन बदल सोयीचा ठरेल, असा विश्वास या संबंधाने नियामकांनी व्यक्त केला आहे. शिवाय बिलावर परवाना क्रमांक नसणे म्हणजे संबंधित खाद्य व्यवसाय विनापरवाना आणि नोंदणीविनाच सुरू आहे, हे समजणे ग्राहकांना सोपे जाईल.

अन्न सुरक्षा नियामकांच्या आदेशानुसार, परवाना आणि नोंदणी अधिकाऱ्यांनी या नवीन धोरणाला व्यापक रूपात प्रसिद्धी देण्यासह, प्रसाराचे काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत येत्या २ ऑक्टोबर २०२१ रोजी ही नवीन पद्धती सर्वत्र अमलात आलेली दिसायला हवी, असेही आदेशात म्हटले आहे.