दैनंदिन वाढती रुग्णसंख्या आणि परिणामी टाळेबंदी उठून अर्थचक्र रुळावर येण्याबाबत वाढत्या अनिश्चिततेने मंगळवारी भांडवली बाजारात निर्देशांक तेजीला बाधा आणली. जगभरात भांडवली बाजारात सकारात्मक वातावरण असताना आणि परिणामी सुरुवात चांगली करूनही दिवसाची अखेर मात्र निर्देशांक घसरणीने झाली.

सत्राची सुरुवात मुसंडीसह करणाऱ्या मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने, उच्चांकापासून ५७४ अंशांनी गडगडला. दिवसाचे व्यवहार आटोपले तेव्हा सेन्सेक्स सोमवारच्या तुलनेत ६३.२९ अंश घसरणीसह ३०,६०९.३० अंशावर स्थिरावला. तर निफ्टी निर्देशांकाला ९,२०० स्तराने पुन्हा हुलकावणी दिली आणि हा मुख्य अडथळा पार करण्यास निर्देशांकाला पुन्हा अपयश आले. सोमवारच्या तुलनेत १०.२० टक्के घसरणीसह निफ्टी ९,०२९.०५ पातळीवर स्थिरावला.

तथापि, मोठय़ा चढ-उतार असलेल्या बाजारात, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांना चांगली मिळाल्याने, या निर्देशांकांनी १.२१ टक्क्य़ांची वाढ दर्शविली. चलन बाजारात रुपयाचे विनिमय मूल्य डॉलरच्या तुलनेत २९ पैशांनी मजबूत होऊन ते प्रति डॉलर ७५.६६ या पातळीवर स्थिरावले.

टाळेबंदी काळात प्रमुख निर्देशांकात १५ टक्के वाढ

मुंबई : टाळेबंदीनंतर ६० दिवसांच्या कालावधीत, ‘बीएसई सेन्सेक्स’ १५ टक्क्यांनी तर विस्तारीत ‘बीएसई ५००’ निर्देशांक ५० टक्क्यांनी वधारला आहे. सेन्सेक्समधील चार समभाग वगळता सर्व समभागांच्या किमती टाळेबंदी-पूर्व तळापासून उसळल्याचे दिसत आहे. सेन्सेक्समधील महिंद्र अँड महिंद्र, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, सन फार्मा, हीरो मोटोकॉर्प आणि बजाज ऑटो या कंपन्यांच्या दरांत सर्वाधिक वृद्धी दिसून आली आहे. मार्चच्या अंतिम सप्ताहाच्या तुलनेत, बीएसई मिडकॅप निर्देशांक १४ टक्के व स्मॉलकॅप निर्देशांकात १८ टक्के वाढ झाली आहे. बहुतांश क्षेत्रीय निर्देशांक दुहेरी अंकात वाढले असून बँकेक्समध्ये केवळ १.४, तर स्थावर मालमत्ता उद्योगाशी निगडित रिअ‍ॅल्टी निर्देशांक ३ टक्क्य़ांनी घसरला आहे.