महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पुण्यासह देशभरातील १४ शहरांमध्ये सीएनजी तसेच नळाद्वारे स्वयंपाकाचा वायू पुरविण्यासाठीची परवाने लिलाव प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. या भागातील किरकोळ वायू वितरणासाठीच्या परवान्याकरिता खुल्या बोलीने लिलाव आता १० जुलै रोजी पार पडणार आहे.
यंदा दुसऱ्यांदा या प्रक्रियेला मुदतवाढ दिली गेली आहे. तेल नियामक पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने सप्टेंबर २०१३ मध्ये देशातील १४ शहरांमध्ये सीएनजी व नळाद्वारे स्वयंपाकाचा वायू पुरविण्यासाठी बोली प्रक्रिया जारी केली होती. यानुसार ११ फेब्रुवारी रोजी हे घडायला हवे होते. मात्र त्यानंतर १२ मेपर्यंत मुदत विस्तारण्यात आली.
महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पुणे शहरांसह एर्नाकूलम (केरळ), नालगोन्डा (आंध्र प्रदेश), बंगळुरू ग्रामीण (कर्नाटक), शाहजहानपूर (उत्तर प्रदेश), गुना (मध्य प्रदेश), पानिपत (हरियाणा), अमृतसर (पंजाब) तसेच दमण-दादरा-नगर हवेली या भागात सीएनजी व नळाद्वारे स्वयंपाकाच्या वायूच्या पुरवठय़ासाठी आवश्यक असलेल्या परवान्याकरिता बोली प्रक्रिया आवश्यक करण्यात आली आहे.
तिला नव्याने मुदतवाढ देताना नियामकाने २३ एप्रिलच्या परिपत्रकात, बोलीधारकांना शहरातील वाहिनी जाळ्यांसाठी आकारण्यात येणारे शुल्क तसेच सीएनजीचा आकार नमूद करण्यास सांगण्यात आले आहे. सीएनजी परवाना हा पुढील २५ वर्षांसाठी असेल. नळाद्वारे स्वयंपाकाच्या वायूसाठी लागणाऱ्या जोडणीचे अंतर, ग्राहकांची अंदाजित संख्याही बोलीधारकांना अधोरेखित करण्यास सांगण्यात आले आहे.
२००९ मध्ये १३ शहरांसाठी दोन फेऱ्यांमध्ये परवान्यांकरिता बोली आमंत्रित करण्यात आली होती. उपरोक्त १४ शहरांसाठी सप्टेंबर २०१० मध्येही बोली प्रक्रिया झाली होती. नोव्हेंबर २०११ मध्ये प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. तर चौथ्या फेरीत महाराष्ट्रातील अलिबाग, पेण, लोणावळा, खोपोलीसह देशातील काही शहरांमध्ये परवाणे अदा करण्यात आले होते. पहिल्या फेरीत गेल कंपनी सहापैकी चार शहरांसाठीच्या परवान्यांपासून दूर राहिली होती. तर दुसऱ्या टप्प्यात इंडियन ऑईल-अदानी समूह काही शहरांसाठी सहभागी झाला नव्हता; उलट रिलायन्स गॅसला आंध्र प्रदेशच्या काही भागासाठी भाग घेता आला. जुलै २०१० मध्ये सुरू झालेली प्रक्रिया फेब्रुवारी २०११ मध्ये संपली. मात्र लाभार्थ्यांंची नावे जाहीर करण्यात आली नाहीत.