मुंबई : बजाज फिनसव्‍‌र्हची उपकंपनी असलेल्या बजाज फायनान्स लिमिटेडने नियोजनबद्ध बचतीचा पर्याय असलेल्या सिस्टेमॅटिक डिपॉझिट प्लॅन अर्थात ‘एसडीपी’ पर्यायाचा परिचय ठेवीदारांना करून दिला आहे. छोटय़ा मासिक बचतींमधून मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांसाठी हा आदर्श पर्याय ठरेल.

दरमहा ५,००० रुपये रकमेपासून सुरुवात करत, गुंतवणूकदार प्रत्येक मासिक ठेवीच्या तारखेला त्या ठेवीसाठी लागू असलेल्या व्याजदराचा लाभ घेऊ शकतील. आवर्ती ठेव योजनेच्या तुलनेत एसडीपीचे वेगळेपण हेच की, यात ठेवीदारांना बदलत्या व्याजदराचा फायदा मिळेल. शिवाय, ठेव योजनेत जमा रकमेबाबत पुरेशी तरलता, प्रसंगी कर्ज उचलही करता येईल. योजनेसाठी गुंतवणूकदार १२ ते ६० महिन्यांच्या कालावधीची निवड करू शकतील. प्रत्येक मासिक ठेवीच्या कालावधीच्या अखेरीस गुंतवणूक रक्कम आणि त्यावरील व्याजाचा समावेश असलेली रक्कम त्यांच्या संबंधित खात्यांमध्ये जमा केली जाईल.