सहकारी बँकेच्या ५.४७ लाख ठेवीदारांना दिलासा

मुंबई : अनियमिततेपोटी आर्थिक र्निबध लादण्यात आलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र (पीएमसी) सहकारी बँकेच्या ठेवीदारांना १०,००० रुपयेपर्यंत रक्कम काढण्याची मुभा रिझव्‍‌र्ह बँकेने गुरुवारी दिली. सहा महिन्यांसाठी असलेला हा दिलासा बँकेच्या ५.४७ लाख ठेवीदारांना लाभदायक ठरणार आहे.  पुरेसा निधी असल्याने वाढीव मर्यादा रक्कम वितरित करण्यात अडचण नाही, असे बँकेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्रासह सात राज्यांत कार्यक्षेत्र असलेल्या पीएमसी बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी आर्थिक अनियमिततेपोटी ठेवी स्वीकारण्यास तसेच कर्ज वितरणास मर्यादा घातली. त्याचबरोबर बँकेच्या ठेवीदारांना १००० रुपये काढण्याचीच परवानगी दिली. याबाबत ग्राहक, खातेदारांनी प्रचंड रोष व्यक्त केल्यानंतर गुरुवारी ही मर्यादा १०,००० रुपयेपर्यंत वाढविण्यात आली.

मार्च २०१९ अखेर २०,००० कोटी रुपयांचा व्यवसाय असलेल्या पीएमसी बँकेचे ९.१२ लाखांहून अधिक ठेवीदार आहे. बँकेकडे ११,५०० कोटी रुपयांहून अधिक ठेव रक्कम असल्याने रिझव्‍‌र्ह बँकेच्या विहित मर्यादेतील पैसे देण्यात बँकेला कोणतीच अडचण नसल्याचे बँकेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

मंगळवारी सहकारी बँकेवर र्निबध लागू झाल्यानंतर बुधवारी लगेचच पीएमसी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमण्यात आला. या सर्व घडामोडींमुळे बँकेला तिची येत्या शनिवारी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभाही रद्द करावी लागली आहे.

होणार काय?

रिझव्‍‌र्ह बँकेचे सहकारी बँकेवर र्निबध असेपर्यंत म्हणजेच सहा महिन्यांच्या कालावधीत ‘पीएमसी’च्या खातेदाराला १०,००० रुपये काढता येणार आहेत. यामध्ये यापूर्वी जाहीर केलेल्या १००० रुपयांच्या रकमेचाही यात समावेश आहे. गुरुवारी ही सवलत देताना बँकेच्या ६० टक्के ठेवीदारांना तिचा लाभ मिळेल, असे रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले.