आपल्या दोन औषधांना विक्रीसाठी केलेल्या प्रतिबंधांविरोधात रॅनबॅक्सी या भारतीय कंपनीने अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. या बलाढय़ यंत्रणेविरुद्ध कंपनीने उचललेले हे पाऊल म्हणजे एक मोठी चूक असल्याचे अमेरिकेने उत्तरादाखल म्हटले आहे. 

रॅनबॅक्सी ही गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईने त्रस्त आहे. एकीकडे सन फार्मा या कंपनीवर ताबा घेण्याच्या प्रक्रियेत व्यग्र असलेल्या या कंपनीच्या नेक्सिअम व व्ॉलसाईट या दोन औषधांच्या अमेरिकेत विक्रीवर तेथील औषध प्रशासनाने बंदी घातली.
अखेर आपल्या या दोन औषधांची विक्री करण्यास मुभा मिळण्यासाठी कंपनीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. ही दोन्ही औषधे जेनेरिक असल्याचे दावा करीत कंपनीने अमेरिकेच्या कोलंबिया जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला आहे. कंपनीच्या या दोन्ही औषधांना २००८ मध्ये सर्वप्रथम अमेरिकेत विक्री करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी मिळाली होती. दोन्ही औषधांसाठी दिलेली तात्पुरती परवानगी ही ‘चूक’ होती, असे आता प्रशासनाने म्हटले आहे. तर प्रशासनाला यापूर्वी केलेल्या चुकीची दुरुस्ती करण्यास आता अधिकार नाहीत, असे कंपनीने तक्रारीत नमूद केले आहे. वादग्रस्त प्रलंबित प्रकरणावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
रॅनबॅक्सी सध्या तिच्या देवास पॅओन्टा या दोन प्रकल्पांतील औषध निर्मितीवरील र्निबधाचाही सामना करीत आहे. यापोटी ५० कोटी डॉलर तडजोड रक्कम भरण्याची तयारीदेखील कंपनीने दाखविली होती.