शेतीसाठी मोठी कर्जे घेणाऱ्यांना कर्जदारांनी शेतमालाच्या भावातील अस्थिरतेची जोखीम टाळण्यासाठी वस्तू वायदा बाजारांनी उपलब्ध केलेल्या व्यवहारांचा फायदा घ्यावा, यासाठी कर्ज देणाऱ्या बँकांनीच उत्तेजन व जागृतीचे काम करायला हवे, असे रिझव्र्ह बँकेने गुरुवारी सूचित केले आहे.
प्रामुख्याने कृषी क्षेत्रातील प्रक्रियादार, व्यापारी, गिरण्यांचे मालक, समन्वयक आणि मोठे शेतकरी यांना कर्ज देताना, त्यांना या प्रकारचे शिक्षण आणि जाणीव जागृती करणे आवश्यक आहे. शेतमालाच्या भावातील अस्थिरता हा त्यांच्या व्यवसायातील धोक्याचा मुख्य घटक असून, त्यापासून बचावासाठी वस्तू वायदा बाजाराचा आधार घेण्यास अशा कर्जदारांना प्रवृत्त केले गेले पाहिजे. बँकेला कर्जफेडीच्या शाश्वतीसाठीही हे आवश्यकच आहे, असे मध्यवर्ती बँकेने गुरुवारी प्रसिद्धीपत्रकान्वये स्पष्ट केले आहे.
अल् निनोचे सावट आणि सलग दुसऱ्या वर्षी पावसाने ओढ धरण्याच्या शक्यतेच्या पाश्र्वभूमीवर रिझव्र्ह बँकेने केलेल्या या सूचनेला विशेषच महत्त्व आहे. वस्तू वायदा बाजारात व्यवहारात कृषी जिनसांचे भावाविषयक भविष्यातील करार (कॉन्ट्रॅक्ट्स) होणारे जोखीम व्यवस्थापन हे स्वत: कर्जदार आणि बँका दोहोंसाठी फायद्याचे ठरेल. त्यामुळे या फायद्यांबाबत माहिती देण्याचे काम बँकांच्या पुढाकारानेच व्हायला हवे. मात्र असे सल्ले  देताना, कर्जदार ग्राहकाची वायदा बाजाराविषयी जाण आणि समज, त्याला आवश्यक असलेली कर्ज रक्कम, तो करू शकणाऱ्या व्यवहाराची मात्रा वगैरे गोष्टी ध्यानात घेतल्या जाव्यात, अशी पुस्तीही रिझव्र्ह बँकेने जोडली आहे.