खासकरून नवउद्यमींसाठी अधिकतर पसंतीचे मानले जाणाऱ्या क्लाऊडवर आधारित इंटरनेट सेवेकरिता रिलायन्सने मायक्रोसॉफ्टबरोबर भागीदारी जाहीर केली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी मोठे डेटा सेंटर सुरू करण्याची घोषणा केली.

यासाठी १ जानेवारी २०२० पासून रिलायन्सडॉटकॉमवर नवउद्यमींना नोंदणी करता येईल. जागतिक स्तरावर या सेवेकरिता १,००० डॉलर महिन्याला आकारले जात असताना आणि भारतातील मासिक २०,००० रुपयेपर्यंतच्या दरांच्या तुलनेत रिलायन्स-मायक्रोसॉफ्टची सेवा १,५०० रुपयांना असेल, असे त्यांनी नमूद केले. भारतातील ८० टक्के छोटे, नवे व्यावसायिक क्लाऊड आधारित इंटरनेट सेवेचा अंगिकार करतात, असे अंबानी यांनी स्पष्ट केले.

‘अझुरे’ नावाच्या या सेवेसाठीची यंत्रणा महाराष्ट्र व गुजरातमध्ये उभी केली जाईल, असे मायक्रोसॉफ्टने सांगितले.